श्री विठ्ठलराव जोशी ट्रस्टच्या- एसव्हीजेसीटी वतीने आयोजित क्रीडा महोत्सवात ऑलिम्पिक प्रदर्शन भरविण्यात आले असून या वेळी कोकणवासीयांना भारताने जिंकलेली ऑलिम्पिक पदके पाहाण्याची दुर्मीळ संधी लाभली आहे.

हॉकीचे जादूगार ध्यानचंद युगातील सुवर्णपदक आणि भारताचे पहिले पदकविजेते खाशाबा जाधव यांचे कांस्यपदक एसव्हीजेसीटीच्या क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित ऑलिम्पिक प्रदर्शनात पाहताना क्रीडारसिक भारावून जाताना दिसत आहे. भारताच्या ऑलिम्पिक यशाच्या छायाचित्रांसह दुर्मीळ व्हिडीओ पाहण्याची संधी यामुळे क्रीडारसिकांना मिळाली आहे. क्रीडालेखक संजय दुधाणे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे प्रदर्शन एसव्हीजेसीटीच्या क्रीडा महोत्सवाचे आकर्षण ठरले आहे.

चिपळूणजवळील डेरवणमधील एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात स्पध्रेच्या कालावधीत २० ते २६ मार्चदरम्यात ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी श्री. विठ्ठलराव जोशी ट्रस्टचे काका महाराज जोशी यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भारताने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले पहिले खाशाबा जाधव यांचे १९५२ हेलसिंकी स्पध्रेतील कांस्यपदक, तर मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या बाबू निमल यांनी जिंकलेले हॉकीतील सुवर्णपदक प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे.

लंडन ऑलिम्पिकचे वृत्तांकन करणारे क्रीडालेखक व क्रीडा पत्रकार प्रा. संजय दुधाणे यांनी संकलित केलेल्या ऑलिम्पिकमधील भारत हे छायाचित्रांचे प्रदर्शन यंदाच्या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरले आहे. १९०० ते २०१२ पर्यंतच्या गेल्या ११२ वर्षांत भारताने जिंकलेल्या २६ ऑलिम्पिक पदकाचा इतिहास या ऑलिम्पिक प्रदर्शनात झळकला असून या वेळी ऑलिम्पिकच्या व्हिडीओज् दाखविण्यात येत आहेत.