|| वसंत मुंडे

शैक्षणिक सर्वेक्षणातील नोंदीमुळे प्रशासन बुचकळ्यात

राज्य आणि केंद्र सरकारच्या संकल्पनेतून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी या वर्षीपासून प्रथमच देश पातळीवर समग्र शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. देशभरातील विद्यार्थ्यांची माहिती या प्रणालीवर नोंदवण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच राज्यात चक्क दीड हजार विद्यार्थी तृतीयपंथी आढळले आहेत. त्यामध्ये मराठवाडय़ातील २७० नोंदींचा समावेश असून नांदेडनंतर बीडमध्ये सर्वाधिक ६५ तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या नोंदी आढळून आल्याने यंत्रणा हाताळणारे प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. याप्रकरणी जिल्हास्तरीय यंत्रणेला खातरजमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने समग्र शिक्षा अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांच्या नोंदी एकत्रित करून त्याच नोंदींवर आधारित त्यांना शासनाच्या योजना पुरवण्याचा उद्देश आहे. सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या शाळांमधील सर्व मुलांच्या ४४ नोंदी समग्र प्रणालीच्या संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.  ही प्रणाली ‘युडायस’वर आधारित असून राज्यातील एक लाख १० हजार ३१५ शाळांची नोंदणी नवीन संकेतस्थळावर झाली आहे.