लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरात करोनाचा उद्रेक वाढतच आहे. आणखी एकाचा बळी, तर एकाच दिवशी तब्बल ४३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४० जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८६४ वर पोहोचली. सध्या २७९ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला शहरात करोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. शहरात आणखी एक मृत्यू व ४३ नव्या रुग्णांची नोंद मंगळवारी झाली. जिल्ह्यातील एकूण २५५ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २१२ अहवाल नकारात्मक, तर ४३ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ८६४ झाली. आतापर्यंत एकूण ४० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. दरम्यान, आज उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात एका ७४ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण गुलशन कॉलनी येथील रहिवासी होता. त्यांना २६ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज सकाळच्या अहवालानुसार ११ जण नवे करोनाबाधित आढळून आले. यामध्ये पाच पुरुष व सहा महिलांचा समावेश आहेत. यात जुने शहर भागातील दोन, तर माळीपूरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर, गाडगे नगर, रेल्वेगेट, अकोट फैल, जवाहर नगर व बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी ३२ रुग्ण वाढल्याने आज दिवसभरात आढळलेली एकूण रुग्ण संख्या ४३ झाली. सायंकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १४ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात पाच जण हैदरपूरा, न्यू तापडिया नगर, खदान प्रत्येकी चार जण, खडकी, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तारफैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस वसाहत रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास, कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोक नगर, फिरदोस कॉलनी, हांडे प्लॉट व सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधित आढळून आलेले परिसर प्रतिबंधित करण्यात येत असून, त्यांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी केली जात आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरात घरोघरी सव्र्हे करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. करोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण व वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात करण्यात अद्याापही प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.
दाखल रुग्ण संख्या वाढली
अकोला जिल्ह्यातील करोना तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांपैकी एकूण ६४८१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ५६१७ आहे, तर सकारात्मक अहवाल ८६४ आहेत. आज एकाही रुग्णाला सुट्टी झाली नाही. त्यामुळे रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्ण संख्येतही मोठी वाढ झाली असून, सध्या २७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अकोल्यात करोनामुळे ४.५१ टक्के मृत्यू
अकोल्यात करोनामुळे मृत्यू होण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दररोज करोनाबाधितांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४० जणांचे मृत्यू झाले आहेत. एक आत्महत्या वगळता करोनामुळे ३९ जणांचे बळी गेले. जिल्ह्यात करोनामुळे मृत्यूचे प्रमाण ४.५१ टक्के आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत अकोल्यातील मृत्यूचे प्रमाण जवळपास एक टक्क्याने अधिक आहे.