केलेले गाळप चालविणे कठीण

सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाच्या गाळप हंगामास प्रारंभ झाला असता ३५ पैकी २३ कारखानेच सुरू झाले खरे; परंतु त्यापैकी पुन्हा तीन कारखाने लगेचच बंद पडले. सध्या  २० कारखाने कसेबसे सुरू असून १५ कारखाने बंद आहेत. प्रचंड प्रमाणात भेडसावणारी ऊस टंचाई व ऊस दर आणि पळवापळवीसाठी होणारी स्पर्धा यामुळे यंदाचा साखर हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

[jwplayer bZoVXId4]

मागील सलग दोन वर्षांत दुष्काळामुळे जिल्ह्य़ात उसाच्या लागवडीत मोठी घट झाली. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात ऊसटंचाई जाणवत आहे. यातच शेजारच्या कर्नाटक राज्यातून ऊस नेण्यास तेथील सरकारने बंदी घातल्याने कर्नाटकातील येणारा ऊस लक्षणीय स्वरूपात घटला आहे. त्यामुळे यंदा गाळप हंगाम आटोपता घ्यावा लागण्याची स्थिती ओढवली आहे. केवळ महिना-दीड महिनाच गाळप हंगाम चालण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पाश्र्वभूमीवर अकलूजचा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, श्रीपूरचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना, माढय़ातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पंढरपूरचा विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सोलापूरचा सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, मंगळवेढय़ाचा संत दामाजी सहकारी साखर कारखाना, मोहोळचा भीमा सहकारी साखर कारखाना, करमाळ्यातील मकाई सहकारी साखर कारखाना असे मोजकेच सहकारी साखर कारखाने सुरू झाले आहेत. तर खासगी साखर कारखान्यांपैकी विठ्ठल शुगर (म्हैसगाव, ता. माढा), युटोपियन व फॅबटेक (मंगळवेढा), लोकमंगल (भंडारकवठे व बीबी दारफळ), जकराया (वटवटे, ता. मोहोळ), जयहिंद (आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर), भैरवनाथ (विहाळ) आदी मोजक्या कारखान्यांना महत्प्रयासाने गाळप सुरू करता आले. परंतु तरीही ऊस टंचाई व ऊसदराच्या स्पर्धेमुळे टिकाव लागत नसल्याने मातोश्री (दुधनी, ता. अक्कलकोट), लोकनेते (अनगर, ता. मोहोळ) व सिध्दनाथ (तिऱ्हे, ता. उत्तर सोलापूर) या तीन साखर कारखान्यांचे गाळपासाठी पेटलेले धुराडे लगेचच थंड झाले. आणखी किमान सहा-सात कारखाने कधीही बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या सुरू असलेल्या साखर कारखान्यांपैकी ७५०० मे. टन गाळप क्षमतेच्या माढय़ाच्या विठ्ठलराव शिंदे कारखान्याने २० दिवसात दररोज सरासरी १२ हजार टन क्षमतेने सर्वाधिक दोन लाख ३२ हजार ७७३ मे. टन उसाचे गाळप केले आहे. यात ९.५५ टक्के सरासरी उतारा घेत दोन लाख १३ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यानंतर पाच हजार टन गाळप क्षमतेच्या पांडुरंग कारखान्याने १९ दिवसात एक लाख ११ हजार ४०० मे. टन, तर साडेसात हजार मे. टन गाळप क्षमतेचा असलेल्या सहकार कारखान्यात दररोज त्याच क्षमतेने गाळप सुरू आहे. या कारखान्याने १५ दिवसांत ८४ हजार ४८४ मे. टन उसाचे गाळप करून ७० हजार १५० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. ऊसपट्टा असलेल्या मोहोळ तालुक्यात लोकनेते कारखान्याने ऊस नसल्याने केवळ २५ हजार मे. टन ऊस गाळप करून बंद होणे पसंत केले. याच भागातील भीमा सहकारी साखर कारखान्यात रडत रखडत गाळप सुरू आहे. या कारखान्यात आतापर्यंत केवळ ९८३५ मे. टन एवढाच ऊस गाळप झाला. तर याउलट शेजारच्या मंगळवेढय़ात संत दामाजी कारखान्याची स्थिती किंचित समाधानकारक आहे. या कारखान्याने आतापर्यंत ५७ हजार मे. टन उसाचे गाळप केले. सिध्देश्व्रर (५१ हजार), विठ्ठल, पंढरपूर (४९ हजार ५००),  विठ्ठल, म्हैसगाव (५४ हजार ७४०), जकराया (४९ हजार ८८०), लोकमंगल, भंडारकवठे (६२ हजार ५४०), भैरवनाथ, विहाळ (३३ हजार ४३०) याप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात गाळप हंगाम सुरू आहे.

[jwplayer psUg1N0g]