26 March 2019

News Flash

औरंगाबाद महानगरपालिका बरखास्त करा, कचराप्रश्नी धनंजय मुंडेची विधानपरिषदेत मागणी

२५ वर्ष सत्ता भोगणारे या प्रश्नाला जबाबदार - मुंडे

कचराप्रश्नावर धनंजय मुंडे आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या औरंगाबाद कचराप्रश्नाचे पडसाद आज विधानपरिषदेतही पहायला मिळाले. कचराप्रश्नावर तोडगा न निघाल्यामुळे काल औरंगाबादेत  दगडफेक आणि जाळपोळीच्या काही घटना समोर आल्या. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला, तर जमावाच्या दगडफेकीत ९ पोलिस कर्मचारी जखमी झाले. या घटनेवर आज विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची मागणी केली.

कचराकोंडीमुळे औरंगाबादकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न चिघळवत ठेवल्यामुळे शहरात एकाप्रकारे आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सेना-भाजपच्या भांडणामध्ये औरंगाबादची वाट लागली असून याठिकाणी प्रशासक नेमा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. दरम्यान कचरा प्रश्नावर आमदार सतिश चव्हाण हेदेखील आक्रमक झालेले पहायला मिळाले. चव्हाणांनी चर्चेदरम्यान पोलिसांनीच वाहने फोडल्याचा गंभीर आरोपही केला.

अवश्य वाचा – औरंगाबादमध्ये कचरा प्रश्नाला हिंसक वळण, दगडफेकीत ९ पोलीस जखमी

सरकारने स्वच्छ भारत अभियान,स्मार्ट सिटी योजना आणल्या असल्या तरी त्या किती तकलादू आहेत, याचा बुरखाच औरंगाबादच्या कचरा प्रश्नाने फाडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद महानगरपालिकेचा कचरा नरेगाव येथे टाकण्यावरून आंदोलन चालू आहे. काल या आंदोलनाला हिसंक वळण लागून पोलिसांनी गोळीबार केला. या राज्यात आता कोणीही आंदोलन केले तरी सरकार त्यांच्यावर गोळीबार करणार आहे का ? असा प्रश्न विचारत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मराठवाडयाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातलाच कचर्‍याचा प्रश्न सोडवता येत नसेल, तर या सरकारला लाज वाटली पाहीजे. गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत ज्यांची सत्ता आहे,त्यांची ही जबाबदारी असल्याचं मुंडे म्हणाले.

अवश्य वाचा – औरंगाबादच्या कचराकोंडीवर तात्पुरता तोडगा; खदान भागात कचरा टाकण्यास परवानगी

मुख्यमंत्र्यांनी नरेगाव ऐवजी खदानीमध्ये कचरा टाकण्यासाठी सांगितले आहे. पण खदानीसाठी ज्या मार्गावरून जावे लागते, त्या मार्गालगतच्या गावांनीही कचर्‍याचा एकही ट्रक जावू देणार नसल्याचे सांगितले आहे. या गंभीर प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या प्रश्नावर उद्या चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे.

First Published on March 8, 2018 5:46 pm

Web Title: opposition leader dhanjay munde demands to dismiss aurangabad municipal corporation over garbage issue