शहरवासीयांनी महापालिकेतील सत्ता मनसेच्या हाती सोपविली आहे. गेल्या वेळी हातातून निसटलेल्या स्थायी समितीवर मनसे आगामी निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करील, असा दावा पक्षाचे सरचिटणीस आ. वसंत गिते यांनी केला. मनसेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमास आक्षेप घेतला जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर, विरोधक पालिकेत सत्ताधाऱ्यांना काम करू देणार आहे की नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मनसे करिअर विभागाच्या वतीने ११ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत मोफत विशेष स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिकेतील सत्ता हाती येऊनही विकास कामे होत नसल्याबाबत नाहक ओरड केली जाते. दुसरीकडे मनसेने कोणताही नवीन उपक्रम हाती घेतला की त्यास विरोध केला जातो. विरोधकांच्या या कार्यपद्धतीवर आ. गिते यांनी बोट ठेवले. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस मनसेने महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील हजारो उमेदवार त्यात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत सुमारे ८०० हून अधिक उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. त्याची अंतिम माहिती जमविण्याचे काम सुरू असून ६ फेब्रुवारी रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नेमणूकपत्रांचे वितरण केले जाणार आहे. यापाठोपाठ आता स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन शिबीर होईल. यंदा स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासक्रमात बदल झाला आहे. त्या अनुषंगाने अभ्यास व पुस्तकांचे वाचन याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये अनभिज्ञता आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेच्या करिअर विभागाने या महिनाभराच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
 गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात हे शिबीर होईल. १० फेब्रुवारी रोजी त्याचे उद्घाटन या क्षेत्रातील तज्ज्ञ व्ही. ए. इनामदार, दीपक पायगुडे, राम खैरनार यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या ग्रामीण भागातील युवकांची निवास व भोजन व्यवस्था करण्याची तयारी मनसेने दर्शविली आहे.