राज्यात इतर ठिकाणी केवळ भूमिपूजनं सुरू असून फक्त आम्हीच कामं करत आहोत, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ते मंगळवारी नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक स्मारकाच्या अनावरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी राज यांनी नाशिकमध्ये मनसेने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. नाशिकमध्ये खासगी कंपन्यांच्या सीआरएस फंडातून सर्वाधिक काम झालेली आहेत. राज्यात इतक्या मोठ्याप्रमाणावर विकासकामे करणारे नाशिक हे राज्यातील पहिलेच शहर असल्याचे राज यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या  नावाचं संग्रहालय उभारायचं असेल तर तिथे शस्त्रास्त्रे असायलाच हवीत. पुतळे उभारण्यावर माझा विश्वास नसल्याचे सांगत यावेळी राज यांनी भाजप आणि शिवसेनेला टोलाही लगावला. केवळ आचारसंहिता असल्यामुळे मला ही उद्घाटने करावी लागतात. आमच्या पक्षाने केलेल्या अजून चांगल्या गोष्टी जनतेसमोर यायच्या असल्याचे त्यांनी म्हटले.

मुकेश अंबानी, महिंद्रा, रतन टाटा यांच्या सारख्या उद्योजकांसमोर जेव्हा नाशिकमधील माझ्या संकल्पना माडंल्या तेव्हा सर्वांनी मला मनापासून दाद दिली. आणि कुठल्याही गोष्टीसाठी ते नाही म्हणाले नसल्याचेही ते पुढे म्हणाले. ही वास्तू नाशिककर जपतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या शस्त्र संग्रहालयात वासुदेव कामत यांच्या सारख्या दिग्गजांची चित्र आहेत. काहींची कामे सुरु आहेत. या चित्रांकडे पाहून शिवाजी महाराजांचा काळ डोळ्यांसमोर उभा राहत असल्याचेही ते पुढे म्हणाले.  इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करणार नाशिक हे राज्यातील पहिलंच शहर असेल. अशी प्रदर्शने व स्मारके इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यातून लोकांना इतिहास कळतो व प्रेरणा मिळत असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले. राज हे उत्कृष्ट कलाकार आहेत. हौशी व महत्वाकांक्षी असल्यामुळे त्यांच्याकडून अशी कामे प्रत्यक्षात घडत असल्याचे सांगत राज यांची त्यांनी पाठ थोपटली.

महापालिका निवडणुकीआधी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाची उभारणी करत मनसेने शिवसेनेलाही अप्रत्यक्षपणे शह देण्याची व्यूहरचना केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेतील अनेकांवर टीकास्त्र सोडले होते. तथापि, शिवसेनाप्रमुखांविषयी त्यांचे ममत्व कायम राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर स्मारकाचा विषय पुढे आला. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्या ठिकाणी स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात बराच कालापव्यय झाला. त्यात वेगवेगळ्या परवानग्यांचा अडसर असल्याने मुंबईत या कामाचा श्रीगणेशाही झालेला नाही. या स्थितीत बाळासाहेबांच्या निधनानंतर मनसेने महापालिकेतर्फे नाशिकमध्ये शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याचे राज यांनी जाहीर केले होते.