वसंत मुंडे

माजी मंत्री पंकजा मुंडे यांची अखेर भाजपने सचिवपदी नियुक्ती करून राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी दिली असली तरी पदाची नेमकी जबाबदारी काय हे त्यांच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट होणे बाकी आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अंतर्गत गटबाजीवर जाहीर ‘नाराजी’ व्यक्त करणाऱ्या पंकजा यांना केंद्रीय कार्यकारिणीत बढती देताना राजकीय शिक्षा दिली काय, अशी चर्चाही त्यांच्या समर्थकांमध्ये रंगली आहे. राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा असताना कमी काळातच बढती मिळाल्याने देशभर प्रभाव निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार हे मात्र निश्चित.

बीड जिल्ह्य़ातील भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची अखेर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चार महिन्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती झाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या कार्यकारिणीत राज्यातून माजी मंत्री विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांच्या बरोबर पंकजा यांनाही संधी देण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ‘पुन्हा संघर्ष’ यात्रा काढून नेतृत्वाची धुरा सांभाळली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात पंकजा यांना पाच वर्षे विविध खात्याच्या मंत्रिपदी काम करण्याची संधीही मिळाली. मात्र पक्षात सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या प्रभावी नेत्या असल्याच्या समर्थकांच्या दाव्याने जनतेच्या मनातील ‘मुख्यमंत्री’ यावरून अंतर्गत वाद धुमसत राहिला. तर केवळ सार्वजनिक विकासकामे, पारंपरिक राजकीय संस्कृती बदलण्याची भूमिका आणि अपरिचित कार्यपद्धती यामुळे पंकजा यांची स्थानिक पातळीवरील ‘नाळ’ तुटली. परिणामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात दारुण पराभव झाला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गोपीनाथगडावरील मेळाव्यात पक्षांतर्गत गटबाजीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करून राजकीय ‘कल्लोळ’ निर्माण केला. परिणामी इच्छुक असतानाही पंकजा यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी नाकारून याच पट्टय़ातील रमेश कराड यांना विधान परिषदेवर संधी दिली, तर भागवत कराड यांचीही राज्यसभेवर निवड केली. वंजारी समाजातील दोघांना खासदारकी आणि आमदारकी देऊन भाजप नेतृत्वाने पंकजाताईंना सूचक इशारा दिला होता. दुसरीकडे प्रदेश कार्यकारिणीत बहीण खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना उपाध्यक्षपद दिले. यामुळे प्रदेश पातळीवरील स्पर्धेत पंकजा यांची पक्षांतर्गत राजकीय ‘कोंडी’ केली जात असल्याचे लपून राहिले नाही. राज्यस्तरावर नेतृत्व करण्याची इच्छा असताना पंकजा यांची अखेर राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांना बढती देऊन जाहीर नाराजी व्यक्त केल्याची शिक्षाच दिली की काय, अशी विचारणा केली जात आहे.

* प्रमोद महाजन यांच्यानंतर राज्य पातळीवरील नेतृत्वाच्या स्पर्धेतून गोपीनाथ मुंडे यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी बढती झाली होती.

* मात्र मुंडे यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवरील संपर्काची नाळ अधिक मजबूत करून प्रदेश भाजपवरील आपली पकड कायम ठेवली होती.

* त्यामुळे पंकजा यांना पक्ष संघटनेत राष्ट्रीय पातळीवर संधी मिळाली असली तरी स्थानिक पातळीवरील संपर्क अधिक मजबूत करून देशभर नेतृत्व प्रस्थापित करण्याचे आव्हान स्वीकारावे लागणार आहे.