पनवेल शहर पोलिसांनी टाळेबंदी दरम्यान सहा विविध गुन्ह्यांमध्ये अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश केल्यानंतर शुक्रवारी सकाळी सापळा रचून उसर्ली गावात  तिघांना गावठी दारु बनविताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत गावठी दारुसाठी लागणारे 810 लिटर रसायन आणि पाच लिटर गावठी दारु असा शेकडो लिटर गावठी दारुचा साठा पोलिसांनी नष्ट केला.

टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलिसांनी केलेली ही सर्वात मोठी कार्यवाही आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यापासून पनवेलमध्ये दारुचा काळाबाजार सूरु झाला असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पनवेल शहर पोलिसांनी यापूर्वी अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात 6 वेगवेगळे गुन्हे नोंदवून 23 आरोपींना ताब्यात घेत तीन वाहनांसह सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.  तर आज (शुक्रवार) उसर्ली गावात गावठी दारु बनविली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वासराव बाबर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक किरण सोनावणे, नंदकुमार माने यांनी सापळा रचून येथील तिघांना ताब्यात घेतले.

पनवेल ते पेण या लोहमार्गालगत हे ठिकाण असल्याने ग्रामस्थांच्या ही बाब ध्यानात आली नाही. घटनास्थळावर त्यावेळी ड्रममधील रसायन आणि दोन स्टोव्हच्या सह्याने दारु बनविली जात होती. पोलिसांनी पेठ गाव येथे राहणाऱ्या भरत म्हात्रे, भगवान जमादार, डान्सर छोटू राठोड या तिघांना अटक केली आहे.

टाळेबंदीतही अवैध मद्यविक्री आणि मद्य बनविणाऱयांना सोडले जाणार नाही. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेले आदेश सक्तीने पाळणे हेच सर्वांच्या हिताचे आहेत. टाळेबंदीदरम्यान मद्यपींनी व्यसन मुक्त होण्यासाठी वेळेचा सदुपयोग करुन व्यसनमुक्त व्हावे.
अजय लांडगे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे</p>