ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर सोमवारी सकाळी कोल्हापूर येथील राहत्या घरानजीक अज्ञान इसमांनी केलेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. हा अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह हल्ला असून हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. साधारणपणे दिड वर्षापूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरही अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता. मात्र, अद्याप दाभोलकरांच्या हल्लेखोरांचा छडा लागला नसताना हा हल्ला झाल्याने पुरोगामी महाराष्ट्र नेमका कोण्ताय दिशेने चालला आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध नोंदवणा-या मान्यवरांनी व्यक्त केलेल्या काही निवडक प्रतिक्रिया.

शरद पवार
कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं उभं आयुष्य सामान्य माणसाच्या हिताची जोपासना करण्यात गेलं. त्यांनी पुरोगामी विचार टिकवण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली. मी गेली ४० वर्षे त्यांना ओळखतो. त्यांनी कधी कुणाचा व्यक्तिगत द्वेष केला नाही. त्यांना कुणी शत्रू असतील असं वाटत नाही. मात्र ते जी भूमिका घेत होते ती भूमिका ज्यांना पटतच नाही अशा प्रतिगामी शक्ती या हल्ल्यामागे कदाचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण असं एक उदाहरण नरेंद्र दाभोलकरांवरील हल्ल्याच्या रूपाने आपल्यासमोर घडलेलं आहे आणि या हल्ल्यातील लोक अद्याप सापडलेले नाहीत. ही अतिशय आव्हानात्मक परिस्थिती आहे. पुरोगामी महाराष्ट्र असं आपण म्हणतो, पण पुरोगामी पद्धतीच्या विचारांना तशा पद्धतीने विचारांनीच ज्यांना उत्तर देता येत नाही अशा प्रवृत्ती वाढल्या आहेत. आता सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रवृत्ती मुळापासून उपटून काढण्याचं काम करावं लागेल.