लातूरमध्ये पाच पाणीटाक्यांवर घागरींची रांग २४ तास..
लातूर शहरातील पाण्याच्या पाच टाक्यांच्या भोवती २४ तास घागरींची रांग असते. लांबच लांब लागलेल्या रांगेत घागर सांभाळत पाणी नेण्यासाठी महिलांना बेरात्रीही थांबावे लागते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आता पोलीस संरक्षणाची मागणी होत आहे. पाण्यासाठी दादागिरी करणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने टाक्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी होत आहे. इतकेच नव्हे तर पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. काही भागांत टँकरनाही पोलीस संरक्षण घ्यावे लागले आहे. सरपंचाला मारहाण, रास्तारोको यांचेही गालबोट लागले आहे. त्यामुळेही पोलीस संरक्षणाची मागणी जोर धरत आहे.
पाण्यासाठी जागता पहारा ठेवण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. पाण्याच्या टाक्यांवरही मोठे दिवे लावले आहेत. मात्र, एखादाच सुरक्षा रक्षक तिथे हजर असतो. त्यामुळे पोलीस संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. महापौर अख्तर शेख यांनीही यास दुजोरा दिला. शहरात प्रत्येक कुटुंबाला पालिकेच्या वतीने पाच दिवसांतून एकदा २०० लिटर पाणी पिण्यासाठी दिले जाणार होते. टंचाईमुळे गेल्या १२ दिवसांपासून हे पाणी देता आलेले नाही.
शहरात पाणी वितरण करण्यासाठी ९ टाक्या आहेत. त्यापकी पाच टाक्यांमध्ये पाणी साठवले जात आहे. डोंगरगाव, माकणी, भंडारवाडी व साई येथील पाणी पुढील तीन महिने सुरक्षित राहावे, या साठी राज्य राखीव दलाची तुकडी लातूरसाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या आठवडय़ात औसा तालुक्यातील अपचुंदा गावात पूजा काजळे या सरपंचाला गावातील काही भागात पाणी येत नाही व तुम्ही काय करता, असे म्हणत ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

कर्मचाऱ्यांचीही टंचाई
महापालिकेकडे पाणीपुरवठा हाताळण्यासाठी पाच अभियंते आहेत. हे मनुष्यबळही कमी पडत असल्याने आणखी सहा अभियंते आणि ५० चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची गरज मांडली जात आहे. अपुऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमुळेही व्यवस्थापनात दोष आहेत. मनपा आयुक्तांनाही पूर्ण वेळ मदतनिसाची गरज आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.