सोलापूरला लघु पारपत्र सेवा केंद्र

पारपत्र (पासपोर्ट)देण्याचे काम अधिक जलदगतीने होण्यासाठी पोलीस पडताळणी आता मोबाइल अ‍ॅपवर केली जाणार आहे. हे काम करणाऱ्या पोलिसांना त्यासाठी विशेष संगणक प्रणाली असलेले टॅब दिले जाणार आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारने सोलापूरमध्ये पारपत्र वितरणाचे लघु सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली असून, हे केंद्र येत्या सहा महिन्यांत कार्यान्वित होईल.

परराष्ट्र मंत्रालयाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल गोतसुर्वे (पुणे) यांनी शनिवारी ही माहिती दिली. पासपोर्ट कार्यालयाने आज व उद्या (रविवारी) अशा दोन दिवसांचे शिबिर नगरमध्ये आयोजित केले आहे. त्यासाठी ते येथे आले आहेत.

या शिबिरात सुमारे २५० जणांची पासपोर्टसाठी प्रक्रिया राबवली गेली. पुणे विभागांतर्गत नगरसह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या सहा जिल्ह्य़ांचा समावेश होतो.

मोबाईल अ‍ॅपवर पोलीस पडताळणी करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर पुण्यातील चार पोलीस ठाण्यांत राबवला जाणार आहे, नंतर तो टप्प्या टप्प्याने इतर ठिकाणी उपयोगात आणला जाणार आहे. यामुळे कार्यालयाचे कामकाज बहुतांशी पेपरलेस होण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्मार्ट गव्हर्नंस’ने देशात चार ठिकाणी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची सूचना केली, त्यानुसार सोलापूर (महाराष्ट्र), उदयपूर (राजस्थान), इंदूर (मध्य प्रदेश) व धर्मावरम (आंध्र प्रदेश) या चार ठिकाणी कार्यालये सुरू केली जाणार आहेत.

सोलापूरचे केंद्र लघु सेवा स्वरूपात असेल. पासपोर्टच्या दीड हजारांवरील प्रक्रियांपैकी सुमारे ३०० प्रक्रिया तेथे पार पाडल्या जातील.

सेवा हमी कायद्यामुळे आता पासपोर्टसाठी लागणारा कालावधी कमी झाला आहे. सात दिवसांत मुलाखतीसाठी निमंत्रण दिले जाते. २१ दिवासांत पडताळणी होते, तर ४० ते ५० दिवसांत पासपोर्ट उपलब्ध होतो, असा दावा करताना गोतसुर्वे यांनी मात्र त्यासाठी सर्व कागदपत्रे बरोबर जोडली जायला हवीत, याकडे लक्ष वेधले.

नगरला आता ‘थाना मॉडेल’

नगर जिल्हा राज्यात भौगोलिकदृष्टय़ा मोठा असल्याने येथे पोलिसांच्या जिल्हा मुख्यालयाचे मॉडेल राबवले जात आहे. त्याचे स्वरूप आता ‘थाना मॉडेल’ (पोलीस स्टेशन) असे केले जाणार आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी लागणारा कालावधी आणखी कमी होईल. सध्या पुण्याहून नगरला ऑनलाइन कागदपत्रे पाठवली जातात, ती नगरला प्रिंट काढून पोलीस ठाण्यांना पाठवली जातात. आता लवकरच ती थेट पोलीस ठाण्यांना पाठवली जातील. नगरला बंद झालेले अर्ज स्वीकारण्याचे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू आहे. पुणे कार्यालयाने सन २०१३ मध्ये १ लाख ७८ हजार, सन २०१४ मध्ये २ लाख १० हजार, सन २०१५ मध्ये २ लाख ८२ हजार तर, १३ जुलै २०१६ पर्यंत १ लाख ४५ हजार पारपत्रांचे वितरण केले आहे.