नगराध्यक्षपदाच्या निवडी लांबणीवर पडल्याने गेल्या काही दिवसांपासून माजी  नगराध्यक्ष डॉ. मधुसूदन केंद्रे व उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यातील तणावपूर्ण नाटय़ात दोन्ही बाजूंनी रविवारी गंगापूर शहरातील परिस्थिती कमालीची स्फोटक बनली. दोन्ही गटांकडून पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या.
गंगाखेड पालिकेचे राष्ट्रवादीचे पाच सदस्य सहलीवरून परतल्यानंतर रविवारी राष्ट्रवादीचे नेते डॉ. मधुसूदन केंद्रे हे दगडू सोमाणी यांच्या घरी पोहोचले. आपण राष्ट्रवादीचे सदस्य असताना भाजपचे नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे  यांच्यासोबत सहलीवर कसे गेलात, असा जाब विचारीत केंद्रे यांनी त्यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा मागितला. डॉ. केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीचे काही कार्यकत्रे या ठिकाणी जमा झाले. सोमाणी यांना धमकावण्यात येत असल्याचे कळताच उद्योजक गुट्टे हेही त्या ठिकाणी पोहोचले. दोन्ही बाजूंनी चालू झालेली धुमश्चक्री आणि राजकीय गरमागरमीने वातावरण तणावपूर्ण बनले. सोमाणी यांच्या निवासस्थानी जवळपास पाच ते सहा तास दोन्ही बाजूंनी कार्यकत्रे जमा झाल्याने खडाजंगी झाली.
गंगाखेड नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना-काँग्रेस-घनदाट मित्रमंडळ व अपक्ष असा ‘गंगाखेड पॅटर्न’ अस्तित्वात आला. त्यामुळे डॉ. केंद्रे यांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सुरुवातीच्या सव्वा वर्षांत काँग्रेसच्या अलका चौधरी व नंतरच्या सव्वा वर्षांसाठी भाजपचे रामप्रभू मुंढे नगराध्यक्ष झाले. चालू महिन्यात नवीन नगराध्यक्षांची निवड होणार होती. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी व भाजपाकडून नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. यामध्ये जयश्री दगडू सोमाणी, मेघा गोिवद अय्या, पद्मिनी विलासराव जंगले, कौशल्याबाई साळवे व शेख अफजलोद्दीन शेख राजा यांचा समावेश आहे. हे सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंढे  यांच्यासोबत सहलीवर गेल्याने पद्मिनी जंगले यांचे पती विलास जंगले यांनी ३१ मे रोजी रामप्रभू मुंढे यांच्याविरोधात पत्नीचे अपहरण केल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर खुद्द पद्मिनीबाई जंगले यांनी आपले अपहरण झाले  नसून आपल्यावर कोणाचाही दबाव  नव्हता असे शपथपत्र न्यायालयात दाखल केले. सत्तास्थापनेसाठी हा संघर्ष सुरू असतानाच राज्य शासनाने नगराध्यक्षांच्या निवडीला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यामुळे संपूर्ण प्रकरणातली हवाच निघून गेली आणि सहलीला गेलेले नगरसेवक गंगाखेड शहरात शनिवारी परतले.
रविवारी सकाळीच डॉ. मधुसूदन केंद्रे हे आपल्या सहकाऱ्यांसह दगडू सोमाणी यांच्या वेदनगरमधील घरी गेले. तेव्हा  सोमाणी हे दत्त मंदिरात गेले होते. त्यांना भ्रमणध्वनीवरून केंद्रे व त्यांचे सहकारी घरी आल्याचे कळविण्यात आले. सोमाणी यांनी पोलिसांसह  राष्ट्रवादीचे नेते रत्नाकर गुट्टे यांना तत्काळ माहिती दिली. पोलीस व गुट्टे हेही सोमाणी यांच्या घरी आले. डॉ. केंद्रे यांनी निवडणुकीसाठी आपण खर्च केला असताना व तुम्ही पक्षाचे अधिकृत सदस्य असताना भाजपसोबत का जाता, असा सवाल करून राजीनाम्याची मागणी केली. त्यावर सोमाणी व केंद्रे यांच्यात मोठी खडाजंगी झाली. अखेर सोमाणी यांनी केंद्रे यांच्या विरोधात जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दिली. तर केंद्रे यांचे समर्थक राजेश वाघमारे यांनी सोमाणी यांच्या विरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली आहे. या दोन्ही तक्रारी पोलिसांनी चौकशीवर ठेवल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी केंगाळ यांनी दिली.