राजकीय फायद्यासाठी कोरेगाव भीमा या ठिकाणी दंगल घडवण्याचा डाव होता. हा डाव आम्ही उधळून लावला असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. दंगल घडवायची आणि त्याचा राजकीय फायदा उचलायचा असा काहींचा डाव होता. मात्र सत्ताधाऱ्यांसोबत आम्ही बसून हा डाव उधळला असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोरेगाव भीमा या ठिकाणी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. सोहळा शांतते पार पडला पाहिजे म्हणून पोलिसांनी कडेकोट नियोजन केलं. दोन वर्षांपूर्वी जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर १० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात होता असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

मराठावाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी राजकीय परिस्थिती बदलली होती. त्यावेळी काही राजकीय लोकांनी दंगल घडवली. तसाच काही डाव यावेळीही होता. राज्यात सत्तांतर झालं आहे ज्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा याठिकाणी दंगल घडवण्याचा डाव होता. मात्र हा डाव आम्ही उधळून लावला.

दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्यामध्ये २०१८ सारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली. ७०० पेक्षा जास्त लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत आक्षेपार्ह २५ टिक टॉक व्हिडिओ आणि १५ फेसबुक पेजवर पोलिसांनी कारवाई केली. सोशल मीडियावरून जातीय भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं होतं.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की “या विजय स्तंभास मागील कित्येक वर्षांपासून देशाच्या अनेक कानाकोपर्‍यातून अभिवादन करण्यास नागरिक येत असतात. या ठिकाणावरून अभिवादन करून गेल्यावर आम्हाला प्रेरणा मिळण्यास मदत होते.”