राहुरीतील मुळा नदीपात्रातून वाळूतस्करीस विरोध करणाऱ्यांच्या अंगावर टेम्पो घालून खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या विष्णू अंबादास चव्हाण (वय ३४, रा. तांदूळवाडी, राहुरी) याचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायालयाने आज, शुक्रवारी फेटाळला.
जिल्हा न्यायाधीश ए. एन. चौरे यांनी हा आदेश दिला. सरकारतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश लगड यांनी काम पाहिले. तांदूळवाडी शिवारात नदीपात्रालगतच रामेश्वर मच्छिंद्र निकम व त्याचा चुलता अण्णासाहेब निकम यांनी गाळपेरीची जमीन तयार केली होती. तेथील नदीपात्रातून काशिनाथ अंबादास चव्हाण हा टेम्पोतून वाळू भरून नेत होता. त्यास रामेश्वर व अण्णासाहेब या दोघांनी विरोध करून टेम्पो अडवला. त्या रागातून काशिनाथने टेम्पोची धडक देऊन दोघांना खाली पाडले व रामेश्वर याच्या पायावर टेम्पो घालून खुनाचा प्रयत्न केला. रामेश्वर गंभीर जखमी झाला. काशिनाथबरोबर असलेले इतर आरोपी दत्तू अंबादस चव्हाण, सचिन बापू चव्हाण यांना अटक करण्यात आली, मात्र विष्णू फरार होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
जखमी व फिर्यादी हे भिल्ल अदिवासी समाजाचे आहेत. आरोपी हे सवर्ण समाजाचे आहेत. गावोगावी सध्या सवर्णाकडून दलित आदिवासींवर अन्याय-अत्याचाराच्या घटना घडत आहेत, अशा परिस्थितीत आरोपी जामिनावर सुटल्यास त्यांना कायद्याची भीती राहणार नाही, असा युक्तिवाद वकील लगड यांनी केला.