स्वाइन फ्लूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शुक्रवारी पहाटे घाटी रुग्णालयात ९ महिन्यांच्या गरोदर महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. चिकलठाणा परिसरातील गल्ली क्र. ३मध्ये राहणाऱ्या राधिका बंडू म्हस्के यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सध्या स्वाइन फ्लूच्या वॉर्डात एका रुग्णास लागण झाली असून, तीन जण संशयित आहेत. एका रुग्णावर व्हेंटिलेटरसह उपचार सुरू आहेत.
स्वाइन फ्लूचे रुग्ण ज्या भागात आढळून येतात, तेथे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी जाऊन प्रतिबंधात्मक उपचार करण्याची आवश्यकता असते. ती नीटपणे केली जात नाही, असा आरोप केला जात होता. मात्र, महापालिकेने २३१ रुग्णांचे स्क्रीनिंग केले आहे. तसेच मयूरनगर भागात ३७८ तर चिकलठाणा भागात २२७ घरांचे सर्वेक्षण केल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला.
जानेवारी महिन्यात महापालिका हद्दीत ४८ संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील ३८जणांचा अहवाल सकारात्मक होता. ३६जण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत १०जणांचा महापालिका हद्दीत मृत्यू झाला. स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दररोज आढावा घेत आहेत. पुरेशी औषध उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.