नीरज राऊत

वाडा येथील प्रसिद्ध झीणी कोलमच्या नावाखाली त्यासारखाच दिसणाऱ्या तांदळाच्या विक्रीतून ग्राहकांची होणारी फसवणूक बंद करण्याच्या दृष्टीने तसेच स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कृषी दिनाचे औचित्य साधून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी आज अर्ज केला जाणार आहे.

‘वाडा कोलम व बहुउद्देशीय शेती उत्पादक सहकारी संस्था मर्यादित’ या संस्थेच्या वतीने ‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’च्या माध्यमातून प्रा. गणेश हिंगमिरे हे चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणी केंद्राकडे वाडा कोलमला भौगोलिक मानांकन मिळण्याच्या दृष्टीने अर्ज दाखल करणार आहेत.

बाजारात वाडा कोलमच्या नावाने सर्रास विकला जाणारा इतर वाणाच्या तांदळामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे वृत्त १४ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. बनावट तांदळाच्या स्पर्धेमुळे संपुष्टात येऊ पाहणाऱ्या या वाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी येथील शेतकरी कृषिभूषण अनिल पाटील, संजय पाटील (बायफ जव्हार), वैभव पाटील (आपटा), भालचंद्र ठाकरे, दिलीप शिलोत्री यांच्यासह १३ समिती सदस्य तसेच हा वाण जपून ठेवणारे वाडय़ातील शेतकरी एकत्रित आले आहेत. त्यांनी वाडा कोलम या वाणाला भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी या वाणाचे आनुवंशिक पुरावे, ऐतिहासिक नोंदी संकलित करणे, तांदळाची वैशिष्टय़े आणि इतर पुराव्यांचे संकलन करणे तसेच या संदर्भात आवश्यक कागदपत्रे पूर्तता करणे हे आव्हानात्मक काम कृषी विभागाच्या सहकार्याने पूर्ण केले.

२०१६ मध्ये सुमारे अडीच हजार हेक्टरवर झीणी कोलमची लागवड केली जात असे. मात्र बनावट नावाने  विकल्या जाणाऱ्या तांदळामुळे वाडा कोलमच्या लागवडीचे प्रमाण कमी झाले. सध्या दीडशे हेक्टरवर झीणी कोलमची लागवड केली जात आहे.

मानांकनामध्ये घोलवडचा चिकू, वेंगुल्र्याच्या काजू, रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील कोकम, रत्नागिरी हापूस, अलिबागचा सफेद कांदा, विदर्भातील दिवापूरची मिरची, मराठवाडय़ाचा केसर आंबा, जालन्याची मोसंबी, बीडचे सीताफळ, उस्मानाबादची शेळी, पश्चिम महाराष्ट्रामधील पुण्यातील आंबेमोहर तांदूळ, सासवड येथील अंजीर, सातारा कोरेगाव येथील वाघ्या घेवडा, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी, कोल्हापूरचा गूळ, आग्रा घनसाळ येथील तांदूळ, सांगलीचा बेदाणा, हळद, नाशिकमधील द्राक्ष, लासलगाव येथील कांदा यांचा समावेश आहे.

मानांकनाचे महत्त्व

या मानांकनामुळे झीणी (वाडा) कोलमचे उत्पादन घेणाऱ्या वाडा परिसरातील शेतकऱ्याला स्वतंत्र ओळख मिळण्यास मदत होणार आहे.बनावट तांदळाच्या स्पर्धेमुळे संपुष्टात येऊ पाहणाऱ्या या वाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न

मानांकन मिळविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

कृषी क्षेत्रात भौगोलिक मानांकन मिळविणारे गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र देशात अग्रणी राहिले आहे. राज्यांमधून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी ३२ अर्ज करण्यात आले असून त्यामध्ये पुणेरी पगडी व पैठणी साडीव्यतिरिक्त इतर सर्व कृषी उत्पादनांचा समावेश आहे. यापैकी २६ उत्पादनांना नोंदी मिळाल्या असून चार अर्ज अंतिम स्तरात आहेत.