16 December 2017

News Flash

साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असल्याच्या राष्ट्रपतींच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्हे

साईबाबा समाधी शताब्दीच्या समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले.

सीताराम चांडे, राहाता | Updated: October 2, 2017 12:51 AM

साईबाबांचे जन्मस्थान पाथरी (जि. परभणी) हे असून राज्य सरकारने त्याच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. या वक्तव्यामुळे शिर्डीतील साईभक्तांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतल्याने वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

साईबाबा समाधी शताब्दीच्या समारंभात राष्ट्रपतींनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद शिर्डीत उमटले. पाथरी येथे बाबांचा जन्म झाला असून त्याच्या विकासासाठी सर्वानी परिषद घ्यावी असे सुचविले होते. पण साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेले साईचरित्र, खापर्डे डायरी, साईबाबा अवतार व कार्य, साईलिलामृत (मराठी) या ग्रंथांमध्येही साईबाबांच्या जात, धर्म, वंश, पंथ व जन्माचा उल्लेख नाही. असे असूनही राष्ट्रपतींनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केले या विषयी साईभक्तांमध्ये संभ्रम आहे. दासगणू महाराज व दाभोळकर यांनी लिहिलेल्या साईबाबांच्या चरित्रातही साईबाबांच्या जन्माचा उल्लेख नाही.

साईबाबांनी गुरू व्यंकुसा, संप्रदाय धर्म कबीर, जात वंश परवदिगार (देव), वय लाखो वर्ष असे सांगितले असल्याचा संदर्भ ग्रंथामध्ये आहे. संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी राष्ट्रपतींबद्दल आपल्याला आदर आहे. पण त्यांना साईबाबांच्या जन्माची चुकीची माहिती देण्यात आली. त्याची चौकशी करून अशी माहिती देणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. मी २३ वर्षे साईबाबा संस्थानचा विश्वस्त होतो. तर वडीलही साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त होते. साईबाबांनी जन्म, जात, धर्म या विषयी काहीही सांगितलेले नाही. तसा उल्लेखही कोठे नाही. या वक्तव्याविषयी भक्तांमध्ये गैरसमज निर्माण होऊन शिर्डीला धक्का बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

साई कथाकार विकास महाराज गायकवाड (रुईकर) यांनी सांगितले की, साईबाबांनी त्यांच्या जन्माविषयी कधीही दुजोरा दिलेला नाही. साईबाबांच्या सर्व ग्रंथांचा आपण अभ्यास केला आहे. साईचरित्र प्रमाणित ग्रंथ आहे. त्या शिवाय दुसरा कोणताही ग्रंथ प्रमाणभूत नाही. या चरित्रातही त्यांच्या जन्माचा उल्लेख नाही. बाबांनी कधीही जातीधर्म व जन्माचा उल्लेख केलेला नाही. संतांना धर्म नसतो.  त्यामुळे हे वक्तव्य कशाच्या आधारे केले हा संशोधनाचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on October 2, 2017 12:51 am

Web Title: president ramnath kovind claim pathri is birthplace of sai baba