नालासोपारा स्थानकात रेल रोको करणाऱ्या ५०० जणांवर गुन्हे दाखल

नालासोपारा येथे झालेल्या रेल्वे आंदोलनातील समाजकंटकांची धरपकड वसई रेल्वे पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या ५०० अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले होते. गुरुवारी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभरात उमटले. सर्वत्र निषेध आंदोलने होत असताना नालासोपारा रेल्वे स्थानकात उग्र आंदोलन करण्यात आले. हजारो प्रवाशांनी नालासोपारा रेल्वे स्थानकात उतरून रेल रोको आंदोलन सुरू केले. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होते. आंदोलकांनी पाच तास रेल रोको आंदोलन केले होते. यावेळी लोकल ट्रेनवर दगडफेक करण्यात आली, तसेच आंदोलकांच्या हल्लय़ात पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. विरार आणि नालासोपारा आंदोलनात पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. या गुन्ह्यात ५०० हून अधिक प्रवाशांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावर सरकारी मालमत्तेचे नुकसान, दंगल आदी भारतीय दंड विधान संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी एका आरोपीची ओळख पटली असून त्याला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली. तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. त्याला अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पवार यांनी दिली.

सीसीटीव्ही चित्रण तसेच मोबाइलमधून केलेले चित्रीकरण तपासून आरोपींचा शोध घेत आहोत. या आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून यासाठी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत घेतली जात आहे.

– भास्कर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक