सलग तीन दिवस भाववाढीचा तडका दाखविणाऱ्या तुरीच्या डाळीचा भाव शनिवारी मात्र क्विंटलला एकदम अडीच हजार रुपयांनी खाली आला. सोळा हजार रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून क्विंटलला साडेतेरा हजार रुपयांपर्यंत भाव गडगडला. ठोक भाव २१५ वरून २०० रुपयांपर्यंत उतरला, तर किरकोळ बाजारपेठेतही २२० रुपये किलो असा भाव शनिवारी होता.

गेले सलग तीन दिवस सातत्याने तुरीचे भाव रोज किमान हजार रुपयांनी वाढत होते. मात्र, शनिवारी एकाच दिवशी अचानक अडीच हजार रुपयांची भावात घट झाली. तुरीबाबत साठवणूक विषयक धोरणात्मक बदल करण्याचे अधिकार केंद्र सरकारने राज्याला दिले आहेत. १ ऑक्टोबर २०१५ ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत डाळीच्या साठवणुकीसंबंधीचे धोरण राज्य सरकारने घेण्यास केंद्र सरकारने सवलत दिली आहे.
मध्य प्रदेश सरकारने शनिवारी डाळीच्या साठवणुकीविरोधात कायदा केला जाणार असल्याचे घोषित केले. साठवणूक विरोधी निर्णय घेणारे मध्यप्रदेश हे देशातील पहिले सरकार आहे.
महाराष्ट्र सरकारने मात्र डाळीच्या भावासंबंधी एवढी ओरड सुरू असतानाही अजून कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे बाजारपेठेचा अंदाज बांधणे कठीण होत आहे.