जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुण्यात ४५० बेडचं विशेष कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करारही केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र शासनाच्यावतीनं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल.”

४५० बेडचं हे विशेष कोविड रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ बेड उपलब्ध असतील. हे कोविड-१९ आजारासाठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल. आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे उपलब्ध करुन देणार आहे.

या विषाणूविरुद्ध लढताना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी म्हणाले. या विषाणूचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत १,१२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनने मुंबई, पुणे, औरंगाबाद, वाळूंज, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणूविरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशातील ३४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune wipro to set up 450 bed special kovid hospital memorandum of understanding with the state government aau
First published on: 05-05-2020 at 19:05 IST