सूर्या धरणातील अतिरीक्त पाणी आणण्याच्या मार्गातला रेल्वे क्रॉसिंगचा अडथळा दूर

नितिन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : सूर्या धरणाचे पाणी रेल्वेच्या पश्चिमेकडील गावांना कालव्याद्वारे  पोहोचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ७०० हेक्टर बागायती जमीन ओलिताखाली येणार आहे.

या धरणाचे पाणी पश्चिमेकडील गावांमध्ये आणण्यासाठी १९९८ पासून शेतकरी मागणी करीत होते. मात्र, त्यासाठी रेल्वे रुळांखालून खोदकामाची आवश्यकता होती. या कामासाठी अलीकडेच पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

सूर्या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी वाहून जात होते. ते डहाणू पश्चिम पट्टय़ातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी अनेक वर्षांपासून करीत होते. कोकण पाटबंधारे खात्याचे  महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी २००९ साली स्थानिक शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सूर्या प्रकल्पातून पाणी आणण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करून घेतला होता.

तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात योजनेच्या सर्वेक्षणासाठी नऊ कोटी ९५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर योजनेचे  काम अंतिम टप्प्यात आले. मात्र रेल्वे रुळांमुळे काम रखडले होते. नागरिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर आता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

शनिवारी खासदार राजेंद्र गावीत आणि माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन पार पडले.

दुबार पेरणीची संधी

योजनेमुळे मोगरबाव, कोलवली, नेवाळे, केतखाडी, बावडा, देदाळे यासह बागायती शेती असलेल्या गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात कलोली, देदाळे, मेंडवळी आणि इतर गावे आण दुसऱ्या विस्तारीत टप्प्यात नवापाडा (बावडे) येथे वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय आसनगांव, चंडीगाव, धाकटी डहाणू, अग्राम—बुमकेत, गुंगवाडा, तडीयाळे, वासगांव, ओसार, तणाशी, पोखरण, वाढवण, वरोर, चिंचणी, बावडे, केतखाडी, मोगरबाव आणि परिसरातील सर्व गावांना शेतीला ओहोळ, नाले, तलाव, लघु पाटबंधारे योजनेचा उपयोग केला जाणार आहे.