राज्याला सध्या परतीच्या पावसानं झोडपलं असून उद्या होणाऱ्या मतमोजणीवरही पावसाचं सावट आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरू असल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून २८ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २८ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहिल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोकण आणि गोव्यातील काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये तुरळक पावसाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली.

दरम्यान, २५ ऑक्टोबर रोजी कोंकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातही मेघघर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये किरकोळ सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मराठवाडा आणि विदर्भ वगळता अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर पुण्यात सोमवारी ४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मंगळवारी दिवसभरात राज्यात पावसाने दडी मारली. मात्र, रात्री ९ नंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. फोर्ट, कुलाबा, वरळी, दादर आणि पश्चिम उपनगरात काही ठिकाणी ५ मिमीपर्यंत पाऊस झाला. नवी मुंबईत वाशी, कौपरखैरणे, जुईनगर, घणसोली येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain expected till 28 october affect on counting maharashtra vidhan sabha election 2019 jud
First published on: 23-10-2019 at 07:44 IST