गेल्या काही वर्षांचा विक्रम मोडणार अशी चिन्हे दिसत असतानाच ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. कोकण, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात जून-जुलमध्ये १५० ते २०० टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र ऑगस्टमध्ये केवळ  ५० ते ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातच नजिकच्या काळात पाऊस जोर धरण्याची चिन्हे नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
ऑगस्टमध्ये मुंबई (-५०%), ठाणे (-२९%), रायगड (-४६%), रत्नागिरी (- ३१%) आणि सिंधुदूर्ग (-२१%) येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. अशीच परिस्थिती पश्चिम व मध्य महाराष्ट्रात दिसून आली. पुणे (- ४३), सातारा (- ४१), सांगली (- ४५) आणि कोल्हापूर (- ३१) येथेही पावसाचे प्रमाण कमी राहिले. लातूर, बीड, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यातही पाऊस फिरकलाच नाही. ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरवली तरी जून- जुलमध्ये झालेल्या पावसामुळे यातील बहुतांश जिल्हे पावसाची सरासरी टिकवून आहेत.
विदर्भातील नागपूर(१२१%), भंडारा(१३७%), तसेच उत्तर भागातील धुळे (१२७%) व अकोला (१३७%) येथे मात्र पावसाने सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली. या जिल्ह्यांच्या आजूबाजूच्या परिसरातही पावसाचा जोर होता. ‘बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होऊन तो मध्य प्रदेशकडे सरकल्याने विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात ऑगस्टच्या तिसऱ्या- चौथ्या आठवडय़ात चांगला पाऊस झाला. पश्चिम किनारपट्टीवर पावसाला अनुकूल स्थिती नव्हती. त्यामुळे राज्यात इतरत्र पावसाचे प्रमाण कमी राहिले,’ असे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.