रत्नागिरी जिल्ह्य़ातील पावसाची गेल्या वर्षीच्या जून महिन्याची सरासरी अवघ्या दहा दिवसांत ओलांडल्यानंतर काल संध्याकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे.गेल्या वर्षी जून महिनाअखेर रत्नागिरी जिल्ह्य़ात एकूण सरासरी ८१७ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला होता. पण यंदा ७ जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे आजअखेर ही सरासरी ओलांडली गेली आहे. वेधशाळेकडील नोंदीनुसार आजअखेर तब्बल ९२३.९ मिलिमीटर पाऊस झाला असून गेल्या पाच वर्षांतील हा विक्रम आहे.
रत्नागिरी जिल्ह्य़ामध्ये जून महिन्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण २००९ (९०.२ मिमी) मध्ये अत्यल्प होते. २०१०मध्ये त्यात बऱ्यापैकी सुधारणा झाली (४२२.४ मिमी). २०११च्या जून महिनाअखेर हे प्रमाण ७९५.७ मिलिमीटर, तर गेल्या वर्षी ८१७ मिलिमीटपर्यंत वाढले. पण यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या पावसाने आजअखेर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दरम्यान गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत कालपासून जिल्ह्य़ात पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले. कालपर्यंत दररोज सुमारे शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची सरासरी राखली जात होती. पण काल संध्याकाळपासून हा जोर ओसरला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्य़ामध्ये ५७.२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड (११८ मिमी) आणि संगमेश्वर (१०१ मिमी) या दोन तालुक्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण चांगले राहिले. जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांपैकी दापोली आणि खेड तालुक्यांत सर्वात जास्त सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पेरणीनंतर शेतीची कामे खोळंबली होती. पण कालपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे जमीन नांगरून मातीची ढेकळे फोडणे, खत मारण्याच्या कामाला वेग आला आहे. अनेक ठिकाणी रोपांची चांगली वाढ दिसून येत आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कालपासून पावसाचा जोर कमी झाला असून आज सकाळपर्यंत संपलेल्या २४ तासांत ५३.६ मिलिमीटर पावसाची नोंद  झाली आहे.