आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करताना दिसत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेही आता तयारीला लागले आहेत. त्यांनी नाशिक, पुणे या दोन शहरांचा पंधरा दिवसांपूर्वीच दौरा केला होता. आता पुन्हा राज ठाकरे आजपासून पुणे शहराच्या तीन दिवसाच्या दौर्‍यावर आले आहेत. या दरम्यान शहरातील मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक शाखा अध्यक्षांच्या स्वतः मुलाखती घेऊन त्यांची निवड करणार आहेत.

महिन्यातील तीन दिवस पुण्यात येऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे मागील दौऱ्यात राज ठाकरे सांगितले होते. त्यानुसारच हा दौरा होत आहे. मात्र यावेळी नवी पेठेतील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक शाखा अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष यांची राज ठाकरे स्वतः मुलाखती घेऊन त्यांची निवड करणार आहेत. या मुलाखतींना आता सुरुवात झाली आहे. या बैठकीत माजी नगरसेवक यांना देखील बोलविण्यात आले असून त्यांच्या देखील मुलाखती होणार आहेत. या दरम्यान आजवरच्या झालेल्या निवडणुकांबद्दल चर्चा होणार असल्याचं मनसे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांच्या गेल्या १५ दिवसाच्या आतला हा दुसरा तीन दिवसीय दौरा आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राज ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी ठाणे इथल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तर आज ते तीन दिवसांसाठी पुण्यात आहेत. या दौऱ्यामध्ये राज हे पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार असून शाखाप्रमुख पदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीही घेणार आहेत.

तर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हेही सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.