News Flash

काँग्रेसने युवा नेता गमावला! खासदार राजीव सातव यांचं निधन

पुण्यात सुरू होते उपचार; काँग्रेसवर शोककळा

काँग्रेसचे खासदार राजीव सातव. (संग्रहित छायाचित्र।पीटीआय)

महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठीला रविवारी पहाटे धक्का देणारी घटना घडली. काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचं निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. राजीव सातव यांनी करोनाविरुद्धची लढाई जिंकली होती, मात्र, फुफ्फुसात संसर्ग झाल्यानं त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील जहांगिर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. २३ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या सातव यांची प्रकृती मध्यतरी बिघडली होती. नंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली होती.

राजीव सातव यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी देशभरात पसरली. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होतं आहे. उद्या सकाळी १० वाजता (१७ मे) हिंगोली येथे सातव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी दिली. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी २१ एप्रिल रोजी करोना चाचणी केली होती. २२ एप्रिल रोजी चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. अहवाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी सातव यांना पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुरूवातीला त्याची प्रकृती चांगली होती. मात्र, २५ एप्रिलनंतर प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात अर्थात आयसीयू वार्डात हलवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबई हलवण्याची चर्चाही सुरू झाली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीत पुन्हा सुधारणा होऊ लागली होती. सातव यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, त्यांना करोना उपचारादरम्यान सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता.

दरम्यान, शनिवारी (१५ मे) काँग्रेसचे नेते व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रूग्णालयात जाऊन, सातव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ‘राजीव सातव यांना काल रात्र थोडा त्रास जाणवला, मात्र ते लवकरच बरे होतील,’ असं म्हटलं होतं मात्र, त्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सातव यांचं पार्थिव हिंगोलीला घेऊन जाण्यात येणार आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून राजीव सातव यांचं निधन झाल्याची माहिती दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या राजीव सातव यांच्या निधनाबद्दल सुरजेवाला यांनी दुःख व्यक्त केलं आहे. “निःशब्द! आज मी असा सहकारी गमावला आहे, ज्याने सार्वजनिक जीवनातील पहिलं पाऊल माझ्यासोबत युवक काँग्रेसमध्ये ठेवलं होतं आणि आजपर्यंत माझ्यासोबत चालत होते…. राजीव सातव यांचा साधेपणा, त्यांचं हास्य, जमिनीशी असलेली नाळ, नेतृत्वाशी आणि पक्षासोबत असलेली निष्ठा व मैत्री नेहमीच आठवत राहिल. माझ्या मित्रा अलविदा, जिथेही राहशील, झळाळत रहा,” अशा शोकभावना सुरजेवाला यांनी व्यक्त केल्या आहेत.

सातव यांच्यावर करोना उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. हा व्हायरसही नवीन प्रकारचा असून, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2021 9:33 am

Web Title: rajeev satav passed away rajeev satav news bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Cyclone Tauktae: मुंबईला अतिवृष्टीचा इशारा; कोल्हापूर जिल्ह्यात घरांची पडझड
2 …असं सांगणाऱ्या पंतप्रधानांच्या देशात दुसरं काय होणार?; संजय राऊतांचा सवाल
3 बीडमध्ये ५ जूनला सरकार विरोधात मोर्चा – मेटे
Just Now!
X