News Flash

..तर मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी  करू देणार नाही – राजू शेट्टी

राजू शेट्टी म्हणाले, सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे.

वरूड येथील शेतकरी एल्गार मेळाव्यात बोलताना खासदार राजू शेट्टी. सोबत जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार व इतर मान्यवर.

जोपर्यंत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही, तोपर्यंत सरकारचा पिच्छा आम्ही सोडणार नाही. सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तीन वर्षांपूर्वी सरकारने दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले असते, तर शेतकरी कर्जबाजारी झाले नसते. म्हणून आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी वरूड येथे आयोजित शेतकऱ्यांच्या एल्गार मेळाव्यात बोलताना दिला.

वरूड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित या मेळाव्याला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रकाश पोकळे, गजानन अमदाबादकर, शरद पाटील, अनिल राठोड, राहुल कडू, सुषमा जाधव, अमित अढाऊ आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र भुयार यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.

राजू शेट्टी म्हणाले, सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी केली पाहिजे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्यावा लागेल. कारण नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकरी मरणासन्न अवस्थेत आला आहे. निसर्गाचे संतुलन बिघडले, त्याला शेतकरी जबाबदार आहे का, असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, या मागणीसाठी सुकाणू समिती आजही आक्रमक आहे.

यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले, सरकार कोणत्याही  गोष्टीला नाही म्हणत नाही. पण काही करीतही नाही. हिटलरशाही पद्धतीने शेतकऱ्यांचा संप चिरडण्याचे काम या सरकारने केले, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी नागपूर जिल्ह्यातील दया राऊत, सुधीर देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश घेतला. पवन दवंडे यांनी सप्तखंजेरी भजन सादर केले. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर दवंडे यांनी केले. या मेळाव्याला मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:15 am

Web Title: raju shetty warn chief minister devendra fadnavis over farmer issue
टॅग : Raju Shetty
Next Stories
1 विडी कामगारांसाठी नगरमध्ये १ हजार घरकुले- बंडारू दत्तात्रेय
2 सरकार दुकानदार होऊ शकणार नाही – महाजन
3 मेळघाटात पाच वर्षांमध्ये १६० मातामृत्यू
Just Now!
X