प्रशांत देशमुख, वर्धा

गटबाजी व हेकेखोरीचा आरोप झाल्याने ज्येष्ठ आमदार व माजी मंत्री रणजीत कांबळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, नाराज कांबळे समर्थक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या निषेधार्थ पदाचे राजीनामे देण्याची तयारी केली आहे.

१९९९ पासून सलग आमदार राहणाऱ्या कांबळे यांची ज्येष्ठतेच्या आधारावर मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता होती. यापूर्वी विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवणाऱ्या कांबळेंकडे त्यापूर्वी लघुउद्योग विकास मंडळाचे अध्यक्षपद होते. असा गाढा अनुभव व सतत देवळीतून विजयाची परंपरा राखणाऱ्या कांबळेंकडे मंत्रीपद सहज चालून येण्याची शक्यता होती. मात्र संधी हुकली. जिल्हय़ात पक्षातील गटबाजीला वारा देण्याचेच काम कांबळेंकडून झाल्याचा आरोप होतो. प्रभाताई व प्रमोद शेंडे यांच्या पश्चात कांबळेच जिल्हय़ातील काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासह इतर पदे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थातील तिकिटांचे वाटप कांबळे यांच्याच मर्जीने होत असे. आर्वीचे अमर काळे वगळता कांबळे यांचा देवळी, वर्धा व हिंगणघाट क्षेत्रात वरचष्मा राहला.

वर्धा शहराचे अध्यक्षपद व पालिका निवडणुकीतील तिकिटाचे वाटप करतांना शेखर शेंडे गटाला सातत्याने डावलल्याच्या तक्रारी झाल्या. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती पर्वाचा प्रारंभ करताना वध्रेत झालेल्या कार्यक्रमात कांबळे- शेंडे वाद जाहीरपणे उफाळला होता. त्याची दखल तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही घ्यावी लागली होती.

शेंडे कुटुंबात भांडणे लावण्याचा आरोप तर प्रमोद शेंडे यांच्या पत्नीने पत्रकार परिषदेतून व्यक्त केल्यानंतर वाद चांगलाच पेटला. शिवाय आर्वी मतदारसंघातील हस्तक्षेप गटबाजीला वेगळे वळण देणारा ठरला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नागपूरात असतांना झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत कांबळे विरोधकांनी तक्रारीचा पाढाच वाचला. कांबळेमुळेच जिल्हय़ात पक्ष खिळखिळा झाला. भाजपची वाढ होण्यामागे कांबळेच कारणीभूत आहे. पक्षातील नेत्यांना संपवण्याचेच काम कांबळेंनी केले. त्यांना आवर घाला, असे गाऱ्हाणेच थोरातांकडे मांडण्यात आले. एवढेच नव्हे तर गत पंधरा वर्षांपासून कांबळे विरुद्ध इतर असेच जिल्हय़ातील गटबाजीचे चित्र राहले. एकही पत्रकार परिषद न घेण्याचा ‘लौकिक’ आहेच. या पार्श्वभूमीवर कांबळेंची बाजू श्रेष्ठीकडे मांडणारा कुणीही नेता नव्हता. त्यांच्या मावशी प्रभाताई राव यांच्या निधनपश्चात कांबळे यांचे दिल्लीचे दोर कापले गेले. त्यातच गटबाजीचा, हेकेखोरीचा, प्रसिद्धीमाध्यमांशी फटकून वागण्याचा आरोप कांबळेंच्या मंत्रीपदाआड आल्याचे ज्येष्ठ नेते सांगतात.

* मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आल्यानंतर कांबळे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. कांबळे समर्थक जिल्हा परिषद सदस्य व वर्धा, देवळी, पुलगाव, सिंदी, हिंगणघाट येथील नगरसेवकांनी राजीनामा देण्याची सोमवारी तयारी केली होती. पण कांबळे यांनी त्यांना थांबवल्याचे कळते. मात्र काहींनी तयारी ठेवली आहेच. जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी यास दुजोरा दिला. नाराजीतून समर्थकांनी पाऊल उचलले असले तरी त्यांना तूर्तास थांबवण्यात आले आहे.