संगीता अल्फान्सो यांच्याकडे तपास द्यावा; नातेवाईकांची पत्रकार परिषद

कोल्हापूर : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणाचा तपास हा तांत्रिक बाबींवर अवलंबून आहे. सध्याचे तपास अधिकारी अजय कदम हे यासाठी सक्षम नाहीत. त्यामुळे हा तपास पूर्वीच्या तपास अधिकारी संगीता अल्फान्सो यांच्याकडे द्यावा, अशी मागणी बिद्रे यांच्या नातेवाईकांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी सांगितले की, ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम हे मुळचे जळगावचे रहिवासी आहेत. या गुन्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचा संशयित आरोपी ज्ञानदेव उर्फ राजेश पाटील हा एकनाथ खडसे यांचा भाचा आहे, तोही जळगावचा आहे. पोलिसांच्या विरोधातील खटला मी लढलो नाही. त्यामुळे ब्रिदे प्रकरणाचा खटला चालवण्यास इच्छुक नाही, असे वक्तव्य अ‍ॅड. निकम यांनी केले आहे.

खटला हातात घेण्यापूर्वीच तो कमकुवत असल्याचे नकारात्मक विधान निकम करत आहोत. यासाठी नवीन दोन वकिलांची नावे सरकारकडे पाठवली आहेत.

बिद्रेचे बंधू आनंद बिद्रे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्याची सुनावणी एक वर्षांत पूर्ण करण्याचे आदेश अलिबाग न्यायालयात दिले आहेत. हा खटला पूर्णपणे तांत्रिक बाबींवर अवलंबून आहे.

अगोदरच्या तपास अधिकारी संगीता अल्फान्सो-शिंदे यांनी सखोल तपास करून पुरावे गोळा केले आहेत. न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर अल्फान्सो या व्यवस्थिती माहिती देऊ शकतील, तांत्रिक बाबी न्यायालयास पटवून सांगू शकतील. त्यामुळे त्यांना पुन्हा तपास अधिकारी म्हणून नेमले जावे. सध्याचे तपास अधिकारी अजय कदम यांचे संशयित आरोपी अभय कुरुंदकर यांचा भाऊ  वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदक र यांच्याशी घनिष्ठ संबध आहेत. संशयितांनी सध्या सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी संशयितांच्या बाजूने अहवाल दिला तर जामीन होण्याची भीती वाटत आहे, असे त्यांनी सांगितले.