वसई : वसईतील देवकुंडी नदीवर अडकलेल्या ७ पर्यटकांना ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने वाचवले. रविवारी  दुपारी ही घटना घडली. वसईत राहणा-या १५ तरुणांचा एक गट वसईच्या कामण येथील देवकुंडी या नदीवर सहलीसाठी गेला होता.

वसई पूर्वेतील परिसरात कामण देवकुंडी नदी परिसर आहे. येथे नेहमी पर्यटक येत असतात. रविवारी दुपारी वसईच्या रानगाव येथील १५ जणांचा गट या ठिकाणी सहलीसाठी गेला होता. यात ४ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश होता. दुपारी अचानक देवकुंडी नदीला पूर आल्याने ७ जन हे नदीच्या पात्रात अडकले होते. या ठिकाणी मोबाईल चे नेटवर्क नसल्याने पर्यटक कुणालाही मदतीला बोलावू शकले नाही. त्यांचा आवाज गावतील काही तरुणांनी ऐकला आणि त्यांच्या मदतीला धावून गेले.

या तरुणांनी या सातही पर्यटकांना नदीच्या पात्रातून दोरीच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले. यावेळी आदिल अली, लव्ह मोर्या, विकी ठाकूर, रिषभ परमार या तरुणांनी या पर्यटकांना मदत केली. मनाई आदेश असताना सहलीसाठी गेल्याने या सर्वांवर कारवाई कऱण्याचे निर्देश वालीव पोलिसांना दिल्याची माहिती वसईचे तहसिलदार किरण सुरवसे यांनी दिली