X

नाशिकमध्ये आजपासून नवे निर्बंध : विकेण्ड लॉकडाउन, १५ तारखेनंतर लग्नसमारंभांना परवानगी नाही; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केलं पत्रक

नाशिकमध्ये दिवसोंदिवस करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नव्याने लागू करण्यात येणाऱ्या निर्बंधांसंदर्भातील पत्रक जारी केलं आहे. विशेष म्हणजे या नव्या निर्बंधांमध्ये १५ मार्चपासून लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स आणि अन्य ठिकाणी लग्न समारंभ तसेच इथर कार्यक्रम आयोजित करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत लग्नसमारंभांसाठी मंगल कार्यालय मालकांनी हॉल देऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये चार हजारहून अधिक करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसोंदिवस या करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नव्याने निर्बंध लागू करण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश असणारं पत्रक जारी केलं आहे.

१) विकेण्ड लॉकडाउन > जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या कालावधीमध्ये सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र यामधून अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, भाजीपाला, फळं, किराणा, दूध आणि वृत्तपत्र वितरण यांना सूट देण्यात आलीय. याच प्रमाणे प्रत्येक शनिवारी आणि रविवारी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता विकेण्ड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. म्हणजेच शनिवारी आणि रविवारी नाशिक जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळतं इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील. याचप्रमाणे सर्व आठवडे बाजार पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.

२) १५ मार्चपर्यंत नियोजित कार्यक्रम स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेऊन करोना नियमांचे पालन करत आयोजित करण्यात यावेत. लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्सच्या मालकांनी यासंदर्भात स्थानिक स्वराज्या संस्था आणि पोलीस स्थानकाकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या अटीवर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत परवानगी देण्यात आली आहे.

३) खाद्यगृहे, परमिट रुम किंवा बार सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत करोनासंदर्भातील नियमांचे पालन करत सुरु ठेवण्याला परवानगी असली तरी आसन क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच परवानगी देण्यात यावी अशी अट घालण्यात आलीय. होम डिलेव्हरी सुद्धा रात्री दहावाजेपर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहे.

४) जीम, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉमप्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग पूल या वैयक्तीत सरावासाठी सुरु राहतील मात्र येथे सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाहीत.

५) सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व उत्सव आणि समारंभांवर बंदी घालण्यात आलीय.

६) धार्मिक स्थळे सकाळी सात ते सायंकाळी सात वेळेत सुरु राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नसेल. तसेच शनिवार आणि रविवार मंदिरे पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

७) भाजी मंडई ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्यात येतील. दिवसा आड एक या प्रमाणे बाजू वाटून हा कारभार केला जाईल.

८) नाशिक व मालेगावं महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या संमतीनंतर उपस्थिती ऐच्छिक असेल असंही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

९) जिल्ह्यातील नाशिक, नांदगाव, निफाड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १० मार्चपासून येथील शाळा, कॉलेज आणि कोचिंग क्लासेस पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.

१०) मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असणार आहे. करोना प्रादुर्भावासंदर्भात जास्तीत जास्त जनजागृती करण्यात यावी.

हे निर्बंध ९ मार्च २०२१ रात्री १२ वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे.

21
READ IN APP
X