सुहास सरदेशमुख 
औरंगाबाद: ‘ध्वज प्रणाम’ अशी एका स्वयंसेवकाने आज्ञा दिली. गुगुल मीटर आणि अन्य अ‍ॅपवर जोडल्या गेलेल्या व्यक्तींनी छातीवर आडवा हात ठेवून प्रणाम केला. प्रार्थना म्हटली. सुभाषित झाल्यावर बोधपर कथा सांगण्यात आली. छोट्या स्वयंसेवकांच्या शाखेत व्यायामाचे प्रकार सांगण्यात आले आणि ताज्या घडामोडीवर चर्चा देखील झाल्या. असे सारे ई-शाखांमधून रोज घडते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा आता रोज वेगवेगळया अ‍ॅपवर घडतात. देवगिरी प्रांतांमध्ये अशा ११० हून ई-शाखा भरत आहेत. देवगिरी प्रांतांचे रा. स्व. संघाचे संघचालक मधुकर जाधव यांनी वृत्तास दुजोरा दिला.

शहरामध्ये सुरू असणाऱ्या प्रभात आणि सायं शाखांचे एकत्रीकरण होत नव्हते. परिस्थितीमुळे आलेल्या अपरिहार्यतेतून करण्यात आलेले बदल एकमेकांना जोडून ठेवणारे आहेत. औरंगाबाद शहरात अशा ४० शाखा सुरू असल्याचे जाधव म्हणाले. करोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर संघ शाखा कशा घ्यायच्या याची चर्चा रा.स्व. संघामध्ये सुरू होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संघ विचाराच्या स्वयंसेवकांनी ‘ ई-शाखा’ ही संकल्पना विकसित केली होती. तसेच विदेशातील अनेक स्वयंसेवकही ठराविक वेळी अशा प्रकारची शाखा घेत होते. औरंगाबादसह मोठ्या शहरांमध्ये ई-शाखा सुरू करण्यात आल्या आहेत.

यामध्ये नेहमीचे शाखेतील व्यवहार केले जात असल्याचे सांगण्यात येते. संघ दक्ष आता ‘गुगल’, ‘स्काईप’ सारख्या माध्यमातून होत आहे. दुसरीकडे ज्यांच्याकडे इंटरनेटची क्षमता कमी आहे अशा ठिकाणी दूरध्वनीवरुन हे सगळे पार पाडले जाते. रा. स्व. संघांची प्रार्थनाही म्हटली जाते. बौद्धिक वर्गही अशाच पद्धतीने घेतले जात असल्याचे जाधव म्हणाले. कोवीड-१९ च्या काळात मदत कशी करावी, याचेही नियोजन केले जात असल्याचे हरीष कुलकर्णी यांनी सांगितले. अलीकडे ‘कुटुंब शाखा ’ असाही प्रयोग केला जात आहे. घरातील सदस्य एकत्र येऊन प्रार्थना म्हणतात. एक तासाच्या शाखा कालावधीमध्ये तसा कोणताही बदल झालेला नाही. एकमेकांशी जोडून राहणे हे काम संघ शाखेतून होत असते. ते प्रत्यक्षात करता येत नसले तरी इंटरनेटच्या मदतील सारे होत आहे, असे सांगण्यात आले.