क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेचा दर्जा घटवण्यात आला आहे. तर, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील महत्वपूर्ण व्यक्तींच्या सुरक्षेबाबत आढावा घेतल्यानंतर निर्णय झाल्याचे दिसत आहे.

सचिन तेंडुलकर यांची ‘एक्स’ दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली असुन  यापुढे त्यांना पोलीस एस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था असणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षेत वाढ करत ती आता  ‘झेड’ दर्जाची करण्यात आली आहे.

याशिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देखील आता ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करून ती ‘वाय’ दर्जाची करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची ‘झेड प्लस’ सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या सुरक्षेतही बदल करण्यात आला असून त्यांची एस्कार्ट सुरक्षा काढण्यात आली आहे. माजी राज्यपाल राम नाईक यांच्या सुरक्षेच्या दर्जातही बदल केला असून, त्यांची ‘झेड प्लस’ सुरक्षा कमी करून ती ‘एक्स’ दर्जाची केली गेली आहे.

आणखी वाचा – सत्ता बदल होताच नारायण राणेंच्या सुरक्षेत कपात

कालच सचिन तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची  ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती.  यावेळी  माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे देखील उपस्थित होते.