News Flash

सदाभाऊ खोत यांच्या ‘रयत’चे विदर्भाकडे लक्ष

‘स्वाभिमानी’ला टक्कर देण्यासाठी ‘रयत’ने विदर्भात धडक देण्याचे नियोजन केले आहे.

सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी

चिखलीत मेळावा घेऊन राजू शेट्टी यांना आव्हान

राज्यातील युती सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेत पडत रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. संघटनेची पाळेमुळे आता संपूर्ण राज्यात रुजवण्यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली आहे. स्वाभिमानी संघटनेला प्रमुख प्रतिस्पर्धी मानत रयत संघटना राज्यात आपला विस्तार करण्याचा प्रयत करेल, हे निश्चित. ‘स्वाभिमानी’ला टक्कर देण्यासाठी ‘रयत’ने विदर्भात धडक देण्याचे नियोजन केले आहे. स्वाभिमानीची काही प्रमाणात ताकद असलेल्या बुलढाणा जिल्हय़ातील चिखली येथून त्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करून स्वाभिमानी शेतकरी संघटना केंद्रात ‘रालोआ’मध्ये तर, राज्यात महायुतीत सहभागी झाली होती. राज्यात युतीची सत्ता आल्यावर सत्तेत वाटा म्हणून स्वाभिमानीचे नेते सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्री पद देण्यात आले. बुलढाणा जिल्हय़ातील स्वाभिमानीचे युवा नेते रविकांत तुपकर यांची वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. केंद्रात व राज्यात सत्तेत असतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करून खासदार राजू शेट्टी यांनी भाजपविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला. शेट्टी यांनी रालोआमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. शेट्टी बाहेर पडल्यावर त्यांचे समर्थक तुपकर यांनी आपल्या शासकीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा  राजीनामा दिला, मात्र खोत यांना खुर्चीचा मोह काही सुटला नाही. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर खोत यांनी रयत क्रांती संघटनेची स्थापना करून स्वाभिमानीला जोरदार आव्हान देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही संघटनांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

दोन्ही संघटनांमध्ये कलगीतुरा रंगला असतांना रविकांत तुपकारांच्या बुलढाणा जिल्हय़ातच शेतकरी मेळावा घेऊन रयत संघटनेकडून स्वाभिमानीला शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला. रयत क्रांती संघटनेचा विदर्भातील पहिला शेतकरी संवाद मेळावा बुलढाणा जिल्हय़ातील चिखलीमध्ये बुधवारी घेण्यात आला. या माध्यमातून रयतने विदर्भात प्रवेश केला आहे. या मेळाव्याला शेतकरयांचा तेवढा प्रतिसाद मिळाला नसला तरी, सदाभाऊ खोत यांच्यासोबत कार्य केलेल्या जुन्याजाणत्या शेतकऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत रयत संघटनेला दिलासा दिला. या मेळाव्यासाठी सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा िपजून काढत शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले होते. त्यामुळे मेळाव्याला बळ मिळाले. या मेळाव्यात सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी संघटनेतील नेत्यांवर तोफ डागली. ‘आंदोलनाची ‘नौटंकी’ करू नका,’ अशी टीका करून शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मेळाव्याला सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली. शेतकरी संघटनेमध्ये सदाभाऊ खोत यांनी बुलढाणा जिल्हय़ातील गावागावांत कार्य केले. त्यामुळे काही गावांतील शेतकऱ्यांचे त्यांच्याशी ऋणानुबंध जुळले आहेत. आजही त्या काही गावातील शेतकरी खोत यांच्यासोबत आहेत. यासोबतच स्वाभिमानीतील रविकांत तुपकर यांच्यावरील नाराज एक गट सदाभाऊ खोत यांच्यासह रयतमध्ये सहभागी झाला. त्यामुळे बुलढाणा जिल्हय़ात आगामी काळात निश्चितच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रयत क्रांती संघटनेकडून आव्हान मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

कृषिमालाच्या भावासाठी रयतचा पुढाकार?

विदर्भातील अनियमित पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच शेतमालाला मातीमोल भाव असल्याने शेतकरी आíथक अडचणीत सापडला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तुरसह इतरही धान्यमालाला योग्य भाव देण्यासाठी सरकारशी चर्चा करून योग्य हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले. त्यामुळे विदर्भातील कृषिमालासाठी रयत संघटना पुढाकार घेण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

चिखली मतदारसंघावर लक्ष्य

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चिखली मतदारसंघातून चाचपणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून ते नेहमीच चच्रेत असतात. बुलढाणा जिल्हय़ात स्वाभिमानी संघटनेने चांगली पकड आहे. आता सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेचा चिखली येथेच विदर्भातील पहिला शेतकरी संवाद मेळावा घेतला. या माध्यमातून रयतनेही चिखली मतदारसंघावर लक्ष्य केंद्रित केल्याचा संदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 2:20 am

Web Title: sadabhau khot rayat kranti sanghatana raju shetti
Next Stories
1 वस्त्रोद्योग कामगारांच्या ‘भविष्य निर्वाहाचे’ काय?
2 ऊस दर आंदोलन शेतकऱ्यांच्याच मुळावर
3 सोयाबिनच्या पडत्या भावाचे दुष्टचक्र
Just Now!
X