News Flash

किमान हातातल्या गोष्टी तरी मार्गी लावा, संभाजीराजेंचं ठाकरे सरकारला आवाहन

नाशिक इथल्या मूक आंदोलनानिमित्त ते बोलत होते. यावेळी त्यांनी आम्हाला ३६ जिल्ह्यात आंदोलन करायची इच्छा नसल्याचंही सांगितलं

नाशिकमधल्या मराठा समाजाच्या मूक आंदोलनावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाच्या मागण्यांपैकी ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, निदान त्या तरी मार्गी लावाव्यात असं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला केलं आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या मूक आंदोलनात संभाजीराजे बोलत होते.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरात मूक आंदोलनांची हाक दिली आहे. कोल्हापूरातून या आंदोलनाची सुरुवात झाली होती. आज नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी त्यांनी जमलेल्या सर्वांना उद्देशून भाषण केलं. या भाषणात त्यांनी  समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे काही पर्याय सुचवले.  Review petition दाखल करणे, तसंच मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत प्रश्न पोचवणे आणि किमान राज्य सरकारच्या हातात जे आहे, ते तरी प्रश्न मार्गी लावणे हे ते पर्याय आहेत.

आणखी वाचा- राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक, पण अद्याप आंदोलन मागे घेतलेलं नाही – संभाजीराजे भोसले

यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याची इच्छा नाही. मात्र राज्य सरकारने किमान आपल्या हातातले प्रश्न, मागण्या तरी सोडवाव्यात. ते पुढे म्हणाले, मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही. मी सर्वांचा नेता आहे. मला बहुजन समाज एकत्र आणायचा आहे.

आजच्या आंदोलनानंतर राज्यातले सर्व मराठा समन्वयक एकत्र बसून आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील असंही संभाजीराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाला सुरुवात केलेली असताना राज्य सरकारने याची दखल घेऊन त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी सविस्तर चर्चा केली.

हेही वाचा- मराठा आरक्षण : “विरोधात गेलो तर ताबडतोब विचारा, भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का?”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा केली. या मागण्यांविषयी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली होती . मात्र, त्याचवेळी आंदोलन अद्याप स्थगित झालेलं नसून पुढील निर्णय २१ जून रोजी नाशिकमध्ये घेतला जाईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 12:42 pm

Web Title: sambhajiraje speaking in nashik on maratha reservation clear the problems that are in limit of maharashtra government vsk 98
Next Stories
1 “राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”
2 मराठा आरक्षण : “विरोधात गेलो तर ताबडतोब विचारा, भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का?”
3 “आम्ही महाभारताचे योद्धे आहोत आणि माझं नाव संजय आहे”; राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल