मराठा आरक्षण : “विरोधात गेलो तर ताबडतोब विचारा, भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का?”

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये मूक मोर्चा झाला. या मोर्चात भूमिका मांडताना छगन भुजबळ यांनी संभाजीराजेंचं कौतुक करतानाच मराठा आरक्षणासाठी केंद्राच्या सहकार्याचीही गरज असल्याचं नमूद केलं.

maratha reservation, chhagan bhujbal
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये मूक मोर्चा झाला. या मोर्चात भूमिका मांडताना छगन भुजबळ यांनी संभाजीराजेंचं कौतुक करतानाच मराठा आरक्षणासाठी केंद्राच्या सहकार्याचीही गरज असल्याचं नमूद केलं. (File Photo Yatish Bhanu>Express Photo )

मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी सुरू असून, आंदोलनंही सुरू झाली आहेत. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची हाक दिली असून, कोल्हापुरातून यांची सुरूवात झाली. दुसरं आंदोलन आज (२१ जून) नाशिकमध्ये झालं. यावेळी लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाबद्दल त्यांच्या भूमिका मांडल्या. राज्याचे मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही यावेळी रोखठोक भूमिका मांडली.

भुजबळ म्हणाले,”मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. माझ्या पक्षाचीही हीच भूमिका आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी कुणीही असो सगळ्यांनीच हे सांगितलं की, इतर आरक्षणांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आरक्षण मिळण्यात अडचणी आहेत. काहीचं म्हणणं असं आहे की, ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठा समाजाला अडचणीत आणण्यासाठी आहेत. पण, असं नाही. दोन्ही समाज अडचणीत आहेत. गेली दोन वर्षे करोनात गेले. करोनामुळे कुणी कुणाच्या घरीही जात नाही. मग माहिती कशी गोळा करणार. काही लोक ओबीसी, मराठा समाज आणि इतर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असं भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा- मी इतकंच सांगेन; संभाजीराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधींना केलं आवाहन

“माझी विचारधारा शाहू-फुले-आंबेडकरांची आहे. हीच आमची दैवतं आहेत. त्यांचेच वारसदार या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आपल्याला काय मिळवायचं हे उद्दिष्ट छत्रपती संभाजीराजेंना माहिती आहे. केंद्रानं आरक्षणावर काही करत नाही. सर्वोच्च न्यायालयात लढत असताना केंद्राच्या सहकार्याची नितांत गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडथळा निर्माण झाला आहे. आपण एकत्र येऊन लढायला हवं. यात सामाजिक तेढ निर्माण होण्याची गरज नाही. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देताना असेच गट पडले होते. गोरगरिब जनता त्यात होरपळली,” अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.

हेही वाचा- “राज्य सरकारने संभाजीराजेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या, आता मराठा आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा”

“आमच्याबाबतीत वेगळीच परिस्थिती आहे. इतर वेळा सगळं व्यवस्थित करतो. पण निवडणुका आल्या की जात. मी शाहू-फुले-आंबेडकरांचा पायिक आहे. त्यामुळे मी कधीही जात बघितली नाही. कुणीही सांगावं की मी मराठा आरक्षणाचा विषय आला आणि मी विरोध केला. पण, काही जण मला विरोधक असल्याचं सांगत असतात. मराठा समाजाला आरक्षण देणं महत्त्वाचं की छगन भुजबळांवर टीका करणं महत्त्वाचं. संभाजीराजेंनी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेतली. आपला लढा व्यवस्थेशी आहे. आतापर्यंत ज्या चर्चा झाल्या. जे प्रस्ताव मांडले गेले, ते सरकारने तातडीने मंजूर करण्यात आले. यापुढेही असंच धोरण सरकारचं असेल. चर्चेशिवाय मार्ग नाही. चर्चा करून कोर्टात जावं लागेल. मी तुमच्याबरोबर आहे. मी कधीही विरुद्ध गेलो, तर ताबडतोब प्रश्न विचारा भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का? कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सर्वांशी माझी बांधलकी आहे,” असं ग्वाही भुजबळ यांनी यावेळी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maratha morcha nashik maratha reservation supreme court maratha protest chhagan bhujbal bmh