दिगंबर शिंदे, सांगली

महापुराने गलितगात्र झालेली सांगलीची बाजारपेठ दोन दिवसाच्या स्वच्छतेनंतर पुन्हा मूळपदावर येत असून शुक्रवारपासून अल्प प्रमाणात व्यवहारही सुरू झाले, तर सांगली बाजार समितीमध्ये हळद, गूळ आणि बेदाणा सौदेही सुरू झाले आहेत. पूरग्रस्त सांगली स्वच्छ करण्यासाठी १ हजार ५८३ कर्मचारी राबत असून आतापर्यंत २ हजार १० टन कचरा निर्मूलन करण्यात आला आहे.

मारूती रोडवर महापुराने साचलेला चिखल काढण्याबरोबरच दुकानातील खराब माल बाहेर काढण्याचे काम आज युध्दपातळीवर सुरू झाले. राज्याच्या विविध भागातील महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जोरदार काम केल्याने सांगलीची स्थिती सुधारत असली तरी कुजलेल्या मालामुळे

दरुगधीचा सामनाही करावा लागत आहे. शहरातील व्यापारी पेठेत जागोजागी खराब झालेले लाकडी सामानाचे ढीग लागले असून स्टेशनरी दुकानापासून ते धान्याच्या दुकानापर्यंत नाशवंत माल रस्त्यावर दिसत आहे.

सांगली शहरात पूरग्रस्त भागातून कचरा काढण्याबरोबरच स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच बृहनमुंबईसह पंढरपूर, इंदापूर, पंढरपूर, वाई, आष्टा, विटा आदी महापालिका, नगरपालिकेचे  बाहेरून आलेले ७८३ आणि महापालिकेचे ८०० कर्मचारी राबत आहेत.  दुकानातील आणि पूरग्रस्त भागातील घरातून रस्त्यावर टाकले जात असलेले साहित्य हटविण्यासाठी १२० वाहने कार्यरत असून शुक्रवारअखेर सुमारे २ हजार १० टन कचरा हटविण्यात आला असल्याचे महापालिकेच्या प्रसिध्दी विभागाकडून सांगण्यात आले.

रस्त्यावरील कचरा हटविल्यानंतर पुन्हा दुसरा खराब माल रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने पुन्हा कचऱ्याचे ढीग जागोजागी दिसत असल्याने ही कचरा उठाव मोहीम रात्रीही सुरू ठेवण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले. तसेच शहर स्वच्छतेसाठी बीयुजी कंपनीकडे मनुष्यबळ मागितले असून लवकरच त्यांच्या मार्फतही स्वछतेचे काम सुरू करण्यात येणार आहे.

शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला असून नळाद्वारे येणारे पाणी उकळून व गाळून वापरण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.  नळाचे पाणी घर व दुकान स्वच्छतेसाठी प्रामुख्याने वापरण्यात येत असून पिण्यासाठी अद्याप वॉटर एटीएमचे पाणी वापरण्यात येत आहे.

महापूर ओसरल्यानंतर गेले तीन दिवस स्वच्छता केल्यानंतर गणपती पेठेत आज काही दुकानातील व्यवहार सुरू करण्यात आले.