दिगंबर शिंदे

महापुराचे भय

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांत गेल्या वर्षी महापुराने हाहाकार उडाला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करावे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी यंत्रणांना दिला. गतवेळच्या पुरानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये उपाय योजण्याचे जाहीर करण्यात आले, पण फारसे उपाय झालेलेच नाहीत. यंदा तशीच परिस्थिती उद्भवल्यास संकट कायम राहणार का, याची नागरिकांच्या मनात भीती आहेच.

करोना संकटाचा मुकाबला करीत असतानाच आता महापुराचा धोका समोर दिसू लागला आहे. प्रशासकीय यंत्रणेने महापुराचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या असून संभाव्य संकटाला सामोरे जाण्यासाठी लोकांनाही दक्ष राहण्याचे आवाहन तर केले जात आहेच, पण पूरपट्टय़ातील लोकांनीही गतवर्षीच्या महापुराची धास्ती घेऊन सुरक्षित स्थळी जाण्यासाठी भाडय़ाने घरे शोधण्याचे काम सुरू केले आहे.

गेल्या वर्षी कृष्णा खोऱ्यात अभूतपूर्व पर्जन्यवृष्टी झाली. सलग नऊ दिवसांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाल्याने आणि कोयना, चांदोली, धोम, कण्हेर आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग एकाच वेळी सुरू होता. त्यातच कृष्णा खोऱ्यातही मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे २००५ च्या महापुराची सांगलीत ५१ फुटांची पाणी पातळी ओलांडून ५७ फुटांपर्यंत मजल मारली होती. अनेक नागरिकांना याचा फटका बसला. अनेक संसार कृष्णेने आपल्या पोटात घेतले. पश्चिम महाराष्ट्रात सधन असलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचे नुकसान झाले. हा महापूर कायमचा धडा शिकवून गेला.

यंदाही पावसाचे प्रमाण १०५ टक्के राहील असा कयास हवामान खात्याने वर्तविला असून यामुळे पूरपट्टय़ातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासकीय पातळीवरून देण्यात आला आहे. गेल्या वर्षी ज्या भागात महापुराचे पाणी शिरले त्या भागातील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वीच स्थलांतरित व्हावे अशा नोटिसाही स्थानिक पातळीवरून बजावल्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आपला बाडबिस्तारा हलविण्याची मानसिक तयारी केली असून त्यासाठी किमान दसरा-दिवाळीपर्यंत भाडय़ाच्या घराची शोधमोहीम हाती घेतली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न

प्रशासन एकीकडे करोना संकटाशी सामना करीत असताना महापुराचे संकट उंबरठय़ावर आहे. महापालिका, ग्रामपंचायतींनी महापुराचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आणीबाणीच्या वेळी लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बोटींची व्यवस्था करणे, पट्टीच्या पोहणाऱ्यांची यादी तयार करणे, गावपातळीवर असलेली जनावरे तत्पूर्वीच सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांच्यासाठी निवारागृहे उभारणे, आदी कामे आताच सुरू केली आहेत. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी या वेळी साथसोवळे पाळावे लागणार असल्याने त्या दृष्टीनेही तयारी करावी लागणार आहे.

या संकटातून पुन्हा नदीकाठ नवी उमेद घेऊन उभा राहिला. पूर्वानुभव लक्षात घेऊन हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.  योग्य नियोजनामुळे शेजारील जिल्ह्य़ापेक्षा सांगली जिल्ह्य़ातील करोनास्थिती आज आटोक्यात आहे. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा खांद्याला खांदा लावून लढा देत आहेत. हीच यंत्रणा आता महापुराचा सामना करण्यासाठी रणांगणावर उतरवावी लागणार असल्याने या यंत्रणेवर किती कामाचा बोजा टाकायचा याचाही विचार करावा लागणार आहे. एकीकडे करोनाविरुद्ध आघाडी सुरूच राहणार असल्याने संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा हाती ठेवावी लागणार आहे.

जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टीच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना करण्याच्या बाबतीत तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २४ बोटी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहेत, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लाई जॅकेट, हेल्मेट, गमबूट अशा अनेक बाबींची खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडे ८७ बोटी व अन्य साधने या महिनाअखेर उपलब्ध होतील.

-डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

पुरामुळे मागील वर्षी ५० टक्के घरे पाण्याखाली होती. या वर्षी महिन्याभरापूर्वीच नालेसफाई सुरू करण्यात आली असून सुमारे ९० किलोमीटर नाले खुले करण्यात आले आहेत. महानगरपालिके च्या आपत्ती नियंत्रण कक्षातून शहरांतील १५ ते २० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे, तसेच महानगरपालिका स्वत:चे आपत्ती अ‍ॅप तयार करत आहे. यावर निवारा केंद्र, मदत केंद्र कुठे आहे, पाणी पातळी किती आहे, याची माहिती मिळेल.

– नितीन कापडणीस, आयुक्त