दिगंबर शिंदे
सहकारातील संस्थानिके अबाधित ठेवण्यासाठी पार्श्वभूमी तयार केली जात आहे. यातूनच भाजपचे खासदार संजय पाटील यांची भाजपच्या तंबूपेक्षा राष्ट्रवादीच्या गोटातील उपस्थिती लक्षणीय वाढली आहे. नजीकच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, सांगली बाजार समिती या आर्थिक केंद्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, काही पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका यांच्यावर सध्या भाजपची सत्ता आहे. एक खासदार, सांगली-मिरजेचे विधानसभेचे आमदार, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य एवढी सत्तास्थाने सद्य:स्थितीला भाजपच्या तंबूत असताना आर्थिक केंद्रे असलेल्या सत्तास्थाने काबीज करण्यासाठी अद्याप सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये कोणत्याच हालचाली नाहीत.
सांगली बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ दिल्यापासून जेजीपी प्रयोगाचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. जेजीपी याचा अर्थ जिल्हा पातळीवर जयंत जनता पार्टी असाच घेतला जातो. काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी विरोधकांना सहकार्य करीत आपल्या सोबत घेण्याची किमया राष्ट्रवादीने घेतली. प्रसंगी एके काळी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महापालिकेत भाजपला सोबत घेउन महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला गेला. मात्र त्या वेळी याला सडेतोड आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेसकडे डॉ. पतंगराव कदम, मदनपाटील यांच्यासारखे बिनीचे शिलेदार होते. या वेळी त्यांची उणीव भासणार तर आहेच, पण काँग्रेसचे नेतृत्व करणारे राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे जयंत पाटील यांना आव्हान देऊ शकतील असे वाटत नाही आणि नेमक्या याच स्थितीचा लाभ राष्ट्रवादी घेण्याच्या तयारीत आहे. आव्हान देणाऱ्यांना योग्य तो इशारा देण्यासाठीच सध्या राष्ट्रवादीची भरती सुरू असून मुख्य मोहरे भाजपमध्ये असले तरी पक्षीय जोडे उंबऱ्याबाहेर ठेवून जिल्हय़ाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे कारण पुढे करून पुन्हा एकदा जेजीपीचा सोयीचा नाटय़प्रयोग पाहण्यास मिळाला तर नवल वाटणार नाही.
एकीकडे करोना संकटाशी अख्खा जिल्हा लढत असतानाच गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी आणि शेती धंदा मोडून गेला आहे. शासनाला जाब विचारण्याची विरोधक या नात्याने भाजपवर जबाबदारी असतानाही जिल्हय़ातील भाजपचे खासदार संजयकाका पाटील मात्र तासगाव, यशवंत साखर कारखाने सुरू करण्यात आडकाठी येणार नाही यावरच लक्ष केंद्रित करून आहेत. खासदार भाजपचे असले तरी त्यांची ऊठबस मात्र राष्ट्रवादी नेत्यासोबत जास्त आहे. यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी खंबीर विरोधकाची उणीव भाजपलाही भासत आहे.
नेत्यांच्या दौऱ्यात गैरहजर
खासदारांनी पुढाकार घेऊन तासगाव येथे कोव्हिड सेंटर सुरू केले. या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाकरिता भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्याची औपचारिकताही पाळली नाही. गेल्या आठवडय़ामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तसेच अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा सांगली दौरा झाला. या वेळी पक्षाचे खासदार यापासून अलिप्त होते.
खासदार पाटील यांचे सध्या प्राधान्य आहेत, ते तासगाव आणि यशवंत या दोन साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करणे. यापैकी तासगाव कारखान्याची राज्य बँकेकडून सहा महिन्यांपूर्वीच ३४ कोटीला विक्री झाली असून पाच वर्षांपूर्वी यशवंत कारखान्याचीही विक्री झाली आहे. हे दोन्ही कारखाने खासदारांशी संबंधित कंपन्यांनी खरेदी केले आहेत. हे दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यात अडचणी येऊ नयेत हाच हेतू खासदारांचा असावा, अशी शंका घेण्यास वाव आहे. करोना संकट, अतिवृष्टी या प्रश्नावर संघर्ष करणे सद्य:स्थितीत कारखाना सुरू करण्यात विघ्न आणणारे ठरू शकते. यामुळेच खासदारांची सध्या तरी कोंडी झाली असून ते शरीराने भाजपचे असले तरी त्यांचे मन मात्र कारखान्यात गुंतले आहे.
खासदार संजयकाका पाटील हे अनेक केंद्रीय समितीवर सदस्य आहेत. यामुळे त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येईलच असे नाही. यामुळे खासदारांच्या अनुपस्थितीचा गैरअर्थ काढणे चुकीचे आहे.
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
खासदार संजयकाका पाटील हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले नाहीत. मात्र त्यांचा पक्षाच्या वरिष्ठांशी नित्य संपर्क आहे. भाजपच्या माध्यमातून त्यांनी रखडलेल्या सिंचन योजनांना गती देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. या योजनांना मूर्तस्वरूप देण्यासाठी त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला तर त्यामध्ये संशय घेण्याचे काहीच कारण नाही.
– मकरंद देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक, भाजप