बेळगावमधील वाचनालयाला १४२ वर्षांचा इतिहास

बेळगावसारख्या सीमावर्ती भागातील मराठी भाषा आणि वाचन संस्कृती सुदृढ व्हावी आणि ती प्रवाही राहावी यासाठी गेली १४२ वर्षे निरंतर कार्य करणाऱ्या सरस्वती वाचनालयास हवेत मदतीचे हात. आजवर केवळ लोकाश्रयावर चाललेला हा वाङ्मयीन यज्ञ आता थंडावण्याची भीती आहे.

बेळगाव आणि मराठी भाषेचे वेगळे नाते आहे. इथल्या जनतेने मराठीबरोबरची असलेली नाळ आजवर मोठय़ा संघर्षांतून टिकवून ठेवलेली आहे. या कार्यात काही संस्थांनीही योगदान देत या भाषेला चिरंजीव केले आहे. यात सरस्वती वाचनालय आणि तिने गेल्या १४२ वर्षांत रुजवलेल्या वाचन संस्कृतीचा मोठा वाटा आहे.

तब्बल ३८ हजार पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय, विविध वृत्तपत्र -आणि नियतकालिकांचे खुले वाचनालय, विद्यार्थी-संशोधकांसाठी अभ्यासिका, मुलांचे वासंतिक वर्ग, विविध व्याख्यानमाला, संगीत-गायनाचे वर्ग, संगीत विषयक परीक्षा केंद्र अशा विविध उपक्रमांमधून ‘सरस्वती’च्या या राऊळातून गेली अनेक वर्षे मराठी भाषा आणि संस्कृतीची सेवा सुरू आहे. यातील बहुतांश उपक्रम हे मोफत, नाहीतर १०-२० रुपयांच्या अल्प शुल्कात सुरू आहेत. इथली मराठी टिकून राहावी या हेतूने गेली १४२ वर्षे हे कार्य केवळ लोकाश्रयावर सुरू आहे.

संस्थेशी संबंधित तीन पिढय़ांनी यासाठी अपार कष्ट उपसले. हजारो ग्रंथ गोळा केले, मदत गोळा करत त्यातून इमारत उभी केली, व्यवस्था निर्माण केल्या. पण आता या दात्यांची आणि कर्त्यांची गात्रे थकली आहेत. संस्थेला ना कुठले ठोस उत्पन्न ना कुठले सरकारी अनुदान. मराठी वाचनालयामुळे ‘सरस्वती’च्या वाटय़ाला कर्नाटक सरकारचेही आजवर केवळ दुर्लक्ष, तर महाराष्ट्र शासनाचीही निव्वळ आश्वासनेच आली आहेत.

ऐंशी वर्षांहून अधिक जुनी इमारत दुरुस्तीस आली आहे. आतील फर्निचर मोडकळीस आले आहे. या सुविधांअभावी शेकडो दुर्मीळ ग्रंथ निराधार बनले आहेत. मराठी भाषेतील सौंदर्य लेणी असलेल्या या साहित्यकृतींच्या शास्त्रीय जतन-संवर्धनाची गरज आहे. पण निधीअभावी ही सारीच कामे थंडावली आहेत. ग्रंथालयातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न हे दैनंदिन खर्चामध्येच संपून जात आहे. यामुळे संस्थेचे मूळ प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. वृद्ध पदाधिकारी आणि केवळ या संस्थेवरील प्रेमापोटी तीन तीन महिने पगाराविना काम करणारे कर्मचारी या अडचणीतूनही बाहेर पडू या आशेने नित्य धडपडत आहेत. त्यांच्या या धडपडण्याला वेळीच मदतीचे हात मिळाले तर सीमाभागातील मराठी वाङ्मयाचा हा यज्ञ चिरंतर होईल.