यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना विचारपूर्वक उतरविण्यात आले. एकीकडे राष्ट्रवादीच्या विरोधात जनमानसात प्रचंड नाराजी, मोदींची लाट तर दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजीचे थैमान वाढल्याने मोहिते-पाटील यांच्यासमोर निवडून येताना अनेक अडचणी होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांनी कडवी झुंज दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. मोहिते-पाटील यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली व त्यांची प्रतिष्ठाही राखली गेली.
या लढतीकडे सर्वाचे लक्ष वेधले असताना मतदानही चुरशीचे झाले होते. मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये कधी मोहिते-पाटील यांनी मतांची आघाडी घेतलेली तर कधी खोत यांनी बाजी मारलेली, असे चित्र वारंवार दिसत राहिल्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली. शेवटी मोहिते-पाटील यांनी २५ हजारांच्या मत फरकाने विजय मिळविला. त्यांना चार लाख ८९ हजार ९८९ (४५.३८ टक्के) तर प्रतिस्पर्धी खोत यांना चार लाख ६४ हजार ६४५ (४३ टक्के) मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले प्रतापसिंह मोहिते-पाटील यांना केवळ २५ हजार १८७ (२.३३ टक्के) मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे प्रतापसिंह व त्यांचे पुत्र धवलसिंह यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. या निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांना स्वत:च्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तब्बल ३९ हजार मतांची निर्णायक आघाडी मिळाली. तर माढय़ातून १४ हजार २२५ मताधिक्य मिळाले, तर माण-खटावमधून १६५२ मतांची आघाडी घेता आली. तर याउलट, या चुरशीच्या लढाईत करमाळ्यात सदाशिव खोत यांनी करमाळ्यातून १४ हजार ८२३, सांगोल्यातून १४ हजार ४७६ तर फलटण भागातून ६०६ मतांची आघाडी घेत मोहिते-पाटील यांना चांगलेच झुंजविले. यात पराभूत खोत यांना दाद द्यावी लागणार आहे.
मागील २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे माढय़ातून निवडून गेल्यानंतर सोलापूर जिल्ह्य़ाच्या पक्षांतर्गत राजकारणात गेल्या पाच वर्षांत मोहिते-पाटील राजकीयदृष्टय़ा अडगळीत पडूनही पक्षनिष्ठा न सोडता व संयम न ढळू देता मोहिते-पाटील हे कसे बसे आपले अस्तित्व टिकवून होते. परंतु मोहिते-पाटील हे सत्तेपासून दूर राहिल्याने विकासाच्या कामात सोलापूर जिल्ह्य़ाची पिछेहाट होत गेली. त्याची बोच जनतेला होती. यातच उफाळून आलेल्या गटबाजीमुळे राष्ट्रवादीत बेबंदशाही निर्माण झाली होती. विशेषत: मागील दोन वर्षांत दुष्काळात उजनी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य जनता विसरली नव्हती. या पाश्र्वभूमीवर माढय़ातील आपला राजकीय वारसदार म्हणून शेवटी मोहिते-पाटील यांच्याशिवाय पवार यांच्यासमोर अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे मोहिते-पाटील यांना विरोध होऊनदेखील पवार यांनी आपला शब्द प्रमाण ठरवत मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी मिळाल्यानंतर अडथळे येणार हे गृहीत धरून मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी मनाचा मोठेपणा दाखवत तालुकास्तरावरील पक्षांतर्गत सर्व विरोधकांची मनधरणी केली. शरद पवार यांच्याही प्रतिष्ठेचा प्रश्न होता. फलटण व माण-खटाव भागातून हिंदुराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह माणचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी असहकार्य केले. हे कमी म्हणून की काय, मोहिते-पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनीही कोणताच विचार न करता अपक्ष म्हणून स्वत:ची उमेदवारी रिंगणात आणली.
एकीकडे गटबाजी शमविण्यासाठी पवारांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मदत उपयुक्त ठरली असताना दुसरीकडे बंधू प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीकडे विजयसिंह मोहिते यांनी दुर्लक्ष करून जोखीम पत्करली. त्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना सामान्य मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. भावनांना हात घालणारी ओजस्वी भाषणे करून खोत यांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. साखरसम्राट विरूध्द ऊस उत्पादक शेतकरी असे नाव देत खोत यांची मोहिते-पाटील यांना हैराण केले होते. तर मागील पाच वर्षांत सत्तेबाहेर राहताना मोहिते-पाटील यांनी दाखविलेला संयमीपणा, जनमानसावर जबरदस्त पकड, सहानुभूती ही मोहिते-पाटील यांची जमेची बाजू होती. शिस्तबध्द प्रचारयंत्रणा महत्त्वाची होती. राष्ट्रवादीबद्दल सार्वत्रिक कमालीची नाराजी असताना अक्षरश: शून्य स्तरावरून मतांची बेगमी केली गेली. मोहिते-पाटील यांच्या ऐवजी अन्य दुसरा उमेदवार असता तर त्याला निवडून येणे फारच कठीण गेले असते, अशी कबुली राष्ट्रवादीची नेते मंडळी देतात. यानिमित्ताने जिल्ह्य़ातील राजकारणात पुन्हा एकदा मोहिते-पाटील यांना वजन प्राप्त होणार असल्याचे मानले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रतिष्ठा राखली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाशिव खोत यांनी कडवी झुंज दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरली. मोहिते-पाटील यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली व त्यांची प्रतिष्ठाही राखली गेली.

First published on: 19-05-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Save honour by vijaysinh mohite patil