तब्बल १३० वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या सोलापुरात विविध सार्वजनिक मंडळांकडून ‘श्री’ पुढे विविध पौराणिक, धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर देखावे सादर करण्यास प्रारंभ झाला आहे. शेवटच्या दोन दिवसांत देखावे तथा सजावट मांडण्याची बहुसंख्य मंडळांची परंपरा आहे.
शहरात यंदा १४३५ सार्वजनिक मंडळांनी विविध सहा मध्यवर्ती मंडळांच्या अधिपत्याखाली ‘श्री’ ची प्रतिष्ठापना केली आहे. त्यापकी काही मोजक्या मंडळांनी देखावे तयार करून खुले आहेत. मात्र हे देखावे पाहण्यासाठी नागरिक अद्यापि घराबाहेर पडण्यास तयार नाहीत. सध्या रात्री रस्त्यावर नागरिकांची तुरळक गर्दी दिसून येते.
बाळीवेशीतील कसबा गणपती मंडळाची भव्य दिव्य स्वरूपात देखावे सादर करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाने रामायणातील सीताहरणाच्या प्रसंगावरील देखावा सादर करण्यात आला आहे. पर्णकुटीत प्रभू रामचंद्र नसल्याची खात्री करून रावणाने सीतेचे हरण केले. भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मणरेषा ओलांडलेल्या सीतेचे साधूच्या रूपातील दुष्ट रावणाने हरण करून श्रीलंकेकडे पलायन केले. वाटेत रामभक्त जटायू पक्ष्याने रावणाला रोखण्याचा प्रयत्न केला असता रावणाने तीक्ष्ण शस्त्राने जटायू पक्ष्याचे पंख छाटले. रामायणातील हा देखावा नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.
पूर्व भागात गणेशोत्सवात सजीव देखावे सादर केले जातात. दाजी पेठेतील बालाजी मंदिरासमोरील श्री अथर्व सांस्कृतिक मंडळाने यंदा चित्रपट जगतात तुफान गाजत असलेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटातील संस्मरणीय प्रसंगावर आधारित सजीव देखावा साकारला आहे. या देखाव्याद्वारे स्थानिक नवोदित नाटय़ कलावंतांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन मिळाले आहे.
रेल्वे लाईन भागातील जीवन महाल चौकात दादाश्री गणपती मंडळाने नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर केला आहे. हा देखावाही नागरिकांना आकर्षति करण्यासाठी सिद्ध झाला आहे. होटगी रस्त्यावर आसरा सोसायटीजवळ श्री छत्रपती ग्रुप मंडळाने यंदा आकर्षक विद्युत रोषणाई करून मंदिराची उभारणी केली आहे.तर बुधवार पेठेतील वडार गल्लीत वडार समाज अय्या गणपती मंडळाच्या वतीने महाभारतातील श्री कृष्णाने तृणावत राक्षसाचा वध केल्याचा देखावा साकारला आहे. या देखाव्यात हलत्या मूर्तीसह प्रकाशध्वनी प्रभावी ठरल्याचे दिसून येते.