मूत्रपिंड तस्करीप्रकरणी सहा डॉक्टर ताब्यात

अकोल्यात उघडकीस आलेल्या आणि राज्यभर जाळे असलेल्या मूत्रपिंड (किडनी) तस्करी प्रकरणात येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नागपूर येथील चार डॉक्टर आणि औरंगाबाद येथील एका रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला (सीईओ) चौकशीसाठी शनिवारी ताब्यात घेतले.
अकोल्यातील शिवाजीनगर येथील आनंद भगवान जाधव (३०) याने संतोष शंकर गवळी यांना व्याजाने २० हजार रुपये दिले होते. कर्ज फेडता न आल्याने आनंद जाधव याने गवळीला मूत्रपिंड विकण्यास भाग पाडले. या प्रकरणातील देवेंद्र शिरसाट याने गवळीचे तत्काळ सांगली जिल्ह्य़ातील इस्लामपूर येथील शिवाजी कोळी यांच्याशी भेट घडवून आणली. शिवाजी कोळी याने गवळीला यवतमाळ येथील डॉ. मंगला आणि डॉ. सुहास श्रोत्री दाम्पत्याकडे आणले. नागपुरातील एका डॉक्टरच्या साहाय्याने संतोष गवळीच्या नागपूरमध्ये तपासण्याकरून गवळीला श्रीलंकेतील कोलंबो येथे नेऊन त्याची किडनी काढण्यात आली. त्यासाठी गवळीला तीन लाख रुपये देऊन त्याची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र शिरसाट आणि आनंद जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली.
या प्रकरणात संतोष गवळी, संतोष कोल्हटकर, शांताबाई खरात, देवा कोमलकर व अमर शिरसाट हे पीडित समोर आले आहेत. शांताबाईला चार लाखांपैकी दोन लाख रुपये देण्यात आले असून, संतोष गवळी आणि कोल्हटकर यांना चारपैकी तीन लाख रुपये देण्यात आले. या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या शोधासाठी अकोला पोलिसांची तीन पथके सांगली, औरंगाबाद आणि नागपूर येथे शुक्रवारी रवाना झाली होती. या पथकाने औरंगाबाद येथील एका मोठय़ा रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि सीईओंना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अकोल्यात आणले आहे. याशिवाय, नागपूर येथीलही चार डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अशा एकूण सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या साऱ्यांची नावे सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.