राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत

गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष वेलिंगकर यांचे बंड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधील अंतर्गत खदखद बाहेर पडली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच संघामध्ये बंड झाले आहे. आता सत्यस्वरूप लोकांसमोर आले आहे असेही ते म्हणाले.

शरद पवार हे रविवारी सकाळी पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी श्री विठ्ठल मंदिरात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, आरएसएस म्हणजे एकसंघ भारत, एकसंघ समाज, एकसंघ विचार, असे चित्र पूर्वी पाहायला मिळायचे.

आता संघामध्ये दुर्दैवाने सामाजिक तट पडलेले पाहायला मिळते. या संस्थेत मोठय़ा प्रमाणात मतभिन्नता दिसून येते असे म्हणत संघावरील बंडावर पहिल्यांदा पवार यांनी भाष्य केले. राज्यात काही ठिकाणी मराठा समाज मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत आहे. आरक्षणाची गरज अजूनही आहे. मूलभूत सुविधांपासून काही लोक वंचित आहेत. त्या सगळ्यांना उभे करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

मराठा समाजाबरोबर जाट, पटेल, धनगर समाजाला आरक्षणाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या समाजातील लोकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करावी म्हणजे अस्वस्थता कमी होईल असे म्हणून पवारांनी आरक्षणाचे समर्थन केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांच्या ७५ व्या वाढदिवसाला सोलापूरला जात असताना ते पंढरपूर येथे आले होते. त्यांच्या सोबत सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे उपस्थित होते.

यावेळी पवार आणि सुळे दांपत्यांनी श्री विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतेले. त्यानंतर मंदिर समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

.. त्यांना कितपत अधिकार आहे- पवार

अ‍ॅट्रॉसिटीबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे यासंदर्भात प्रश्न विचारला असता पवारांनी त्याची खिल्ली उडवली. सार्वजनिक जीवनात ५० वर्षे सामाजिक परिवर्तनाचं काम केले आहे. नामांतराचा प्रश्न असो की ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा, त्यासाठी मला किंमत मोजावी लागली आहे. त्यामध्ये कोठेही तडजोड केली नाही. यासंबंधी कुणीतरी असे काही विचारावे, असा त्यांना कितपत अधिकार आहे, याची माहिती नाही. उद्धव ठाकरे हे सत्ताधारी पक्षातील घटक पक्षाचे आहेत, त्यामुळे अ‍ॅट्रॉसिटीवर विशेष अधिवेशन बोलावण्याचा सत्ताधारी पक्षाचा विचार दिसतोय, असे शरद पवार म्हणाले.