कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र पेटला, असा आरोप संभाजी भिडे गुरूजींनी केला आहे. सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकीय स्वार्थ आणि मतांसाठी या दंगलीचा वापर करण्यात आला. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यामुळे याची चौकशी केली जावी, अशी मागणी करत येत्या २८ मार्चला महाराष्ट्रात मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

संभाजी भिडेंना २६ मार्चपर्यंत अटक करा, अन्यथा मुंबईत मोर्चा-प्रकाश आंबेडकर

मागील चार ते पाच वर्षांत मी वढू गावात फिरकलेलोही नाही. काही संबंध नसताना माझं नाव या प्रकरणात घेतलं आहे. दलितांना खूश करण्यासाठी व त्यांची मते मिळवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवल्याचा आरोप भिडे गुरूजींनी केला. आंबेडकर हे विद्वान आणि मोठ्या कुळात जन्मलेले आहेत. त्यांनी तरी विचारपूर्वक बोलायला हवे होते. त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. यावर काय बोलावं हेच कळत नाही. जे घडलंच नाही, त्यावर हा सगळा आगडोंब उसळला. त्यामुळे या दंगलीची चौकशी झाली पाहिजे. ज्या महिलेने मला दगड मारताना पाहिले त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

दंगलीत झालेल्या नुकसानीचे सरकारने पैसे भरण्याची काहीच कारण नाही, असेही ते म्हणाले. कोरेगाव-भीमा प्रकरणी सरकारचेही धोरण बोटचेपे पणाचे राहिले. या दंगलीचे खरे सूत्रधार वेगळेच आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी करायला हवी. एल्गार परिषद घेणाऱ्यांना पहिल्यांदा अटक करायला हवी. प्रकाश आंबेडकरांचीही चौकशी करावी. आता ते विधानसभेला घेराव घालणार आहेत. मला अटक होईपर्यंत ठिय्या आंदोलन करणार आहेत म्हणे. देव त्यांना बुद्धी देवो, शहाणपणा देवो, इतकंच मी म्हणेन. वास्तविक लोक वेगळेच आहेत. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांनी माझ्यावर आरोप केला. त्यांनी खात्री तरी करावी. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नंतर महाराष्ट्र पेटला होता, असा आरोप त्यांनी केला. येत्या २८ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात याप्रकरणी मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, मिलिंद एकबोटेंना अटक केल्यानंतर प्रकाश आंबेडकर व इतर संघटनांनी संभाजी भिडे गुरूजींनाही अटक करण्याची मागणी केली होती. त्यासाठी आंदोलन पुकारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता.