आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने शिवसेनेने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवली असली तरी रावते यांच्या समोर पूर्व विदर्भातील संघटन बांधणीचे अतिशय खडतर आव्हान आहे.

शिवसेना सत्तेत राहून देखील विरोधी पक्षाप्रमाणे सातत्याने सरकार विरोधात भूमिका मांडत असते. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये देखील या दोन्ही पक्षाचे फाटले. त्यामुळे शिवसेनेने पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे, परंतु भाजपच्या विस्तारवादी धोरणापुढे शिवसेनेची गोची होत आहे. त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात शिवसेनेची ताकद सातत्याने घटत आहे. रामटेकमधील एक खासदार आणि वरोरा येथील एक आमदार सोडल्यास शिवसेनेला पूर्व विदर्भात थारा नाही. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्य़ात जम बसवला होता. आता तशी स्थिती राहिलेली नाही आणि भाजपने त्यांच्या सर्व मतदारसंघावर वर्चस्व मिळवले आहे.

रावते यांच्याकडे विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून अलीकडे जबाबदारी टाकण्यात आली आहे. रावते यांनी यापूर्वी पश्चिम विदर्भात संघटन बांधणीचे काम केले आहे. नागपूरचेही त्यांनी दौरे केले आहेत, परंतु पक्षबांधणीच्या दृष्टीने पहिल्यांदाच पूर्व विदर्भात त्यांना जावे लागणार आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावती नगर परिषद अजूनही शिवसेनेकडे आहे, परंतु चंद्रपूर महापालिका तसेच गडचिरोली, भंडारा, नागपूर, वर्धा   स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेची अतिशय वाईट स्थिती आहे. पूर्व विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रारंभी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपने त्यांना संपवण्याचे काम केले आहे. हे आव्हान रावते यांना पेलायचे आहे. भाजपप्रणित सरकारमध्ये मंत्री आणि पक्षाचे अनुभवी शिवसैनिक असलेल्या रावते यांच्यासाठी विदर्भातील उरले-सुरले शिलेदार कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. नागपूर महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ अध्र्याहून कमी झाले. यापूर्वी शिवसेनेचे सहा नगरसेवक होते आणि आता केवळ दोन नगरसेवक आहेत. यामुळे एकेकाळी उपमहापौर देऊन मान राखल्या जाणाऱ्या शिवसेनेला भाजप नागपूर महापालिकेत दुय्यम स्थान देत आहे.

पूर्व विदर्भात रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अस्तित्व टिकवून आहे. शिवसेनेच्या रामटेक गडाला खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नागपूर जिल्ह्य़ात (शहरात आणि ग्रामीण) १२ जागांपैकी एकही जागा शिवसेनेकडे नाही. खासदार आहे, परंतु आमदार नाही, अशी स्थिती आहे. त्यांचा रामटेक विधानसभा या पारंपरिक मतदारसंघातही भाजपने घुसखोरी केली आहे. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला स्थिती मजबूत करता आलेली नाही.

विरोधी पक्षात असतानापेक्षा सेनेची स्थिती आज सत्तेत असतानाही वाईट आहे. कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे आहे ती शक्ती कायम ठेवून भाजपचे या भागातील आव्हान मोडून काढण्यासाठी नव्याने संघटनात्मक पाठबळ उभे करण्याचे आव्हान सेनेपुढे आहे. रावते यांनी पहिल्या दौऱ्यात नागपूर जिल्हा कार्यकारिणी लवकरच बदलण्याची जाहीर केले आहे. तसेच शाखा प्रमुख नियुक्तीचे काम सुरू केले आहे. गणेशोत्सावानंतर परत ते विदर्भात संघटन बांधणीसाठी येतील, असे शिवसेनेचे नागपूर जिल्ह्य़ाचे अध्यक्ष सतीश हरडे म्हणाले.