वरोरा-भद्रावतीचे आमदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. भाजपा-शिवसेना युतीमुळे नाराज असलेल्या धानोरकरांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. भाजपाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. दरम्यान, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. युती होताच धानोरकर यांनी भाजपा तथा केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या विरोधात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. विधानसभेतील पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे व माजी खासदार नरेश पुगलिया या तीन नावांशिवाय काँग्रेसकडे चौथे नाव नाही. त्यातही वडेट्टीवार व धोटे या दोन्ही नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तर पुगलिया उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, काँग्रेसला युवा उमेदवार हवा आहे. अशातच विजय वडेट्टीवार हे विधान परिषद निवडणुकीपासून धानोरकर यांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे, विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रकुमार सराफ यांचा प्रचार केला होता. तेव्हापासूनच वडेट्टीवार-धानोरकर यांची मैत्री अधिक घट्ट झाली. त्याच मैत्रीतून वडेट्टीवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत धानोरकर यांची भेट घालून दिली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा, वणी व आर्णी हे पाच मतदारसंघ कुणबीबहुल आहेत. काँग्रेसलाही कुणबी समाजाचा युवा चेहरा हवा आहे.