News Flash

पडळकरांनी केलेलं वक्तव्य भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना?; शिवसेनेचा टोला

बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले, शिवसेनेची टीका

भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून पडळकर यांच्याविरोधात तीव्र भावना व्यक्त होत होत्या. दरम्यान, शिवसेनेनंही पडळकर यांच्या विधानावरून त्यांच्यावर आणि भाजपावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर यांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपाची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे, अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याच्या गुळण्या पडळकर यांनी टाकल्या. ‘पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहांना भडकवायचे आणि लढवायचे हे धोरण राबविले’, असे ते म्हणतात. ‘पवारांकडे विचारधारा नाही, व्हिजनही नाही आणि अजेंडा नाही’, असे मनाचे श्लोकही गोपीचंद यांनी म्हटले आहेत. गोपीचंद यांनी ही जी विधाने पवारांबाबत केली ती भाजपाच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीकेचा बाण सोडला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला.

काय म्हटलंय अग्रलेखात?

गोपीचंद हे राजकारणामधील कच्चे मडके आहे हे माहीत होते, पण कच्चे मडके फुटकेदेखील आहे हे आता सिद्ध झाले. पडळकर यांनी पवारांबाबत केलेली विधाने वादग्रस्त आहेत. पवारांची ज्येष्ठता, अनुभव, व्यासंग, समाजकारण याचा गौरव पंतप्रधान मोदी यांनीही अनेकदा केला आहे. पवार यांना महाराष्ट्रात आणि देशात मोठा मान आहे. पवार हे आपले गुरू असल्याचे मोदी यांनी न डगमगता सांगितले आहे. गोपीचंद हे आज भाजपाच्या बिळात शिरले आहेत. बिळातला बिनविषारी साप जोरात डंख मारतो तसे पडळकरांनी केले.

पडळकरांनी सांगलीमध्ये भाजपाविरोधात निवडणूक लढवली. ‘भाजपाला मत देऊ नका. मी भाजपासाठी कधी मत मागायला आलो तर जोड्याने मारा मला,’ असे हेच पडळकर तेव्हा सांगत. पुढे हेच पडळकर भाजपामध्ये आले व बारामतीत अजित पवारांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार झाले. पण बारामतीत धनगर समाज मोठ्या प्रमाणात असूनही पडळकरांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यामुळे या महाशयांचा अजेंडा, व्हिजन वगैरेबाबत गोंधळ आहे. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह नाहीत हा गोपीचंद यांचा आक्षेप आहे. यात पवारांचा संबंध येतोच कुठे? हा फैसला फडणवीस सरकारने करायचा होता.

कोणताही अभ्यास, संदर्भ, जनमत पाठीशी नसलेले लोक भाजपाने भरती करून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे ती अशी! शरद पवार यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतात. त्यांच्यावर टीकाटिप्पणी होऊ शकते. लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे, पण पवारांसारख्या ज्येष्ठांवर अशा घाणेरड्या शब्दांत टीका करणार्‍यांनी स्वतःचे पाय कोठे आहेत, आपली लायकी काय याचे आत्मपरीक्षण आधी करावे.

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी तळागाळातील बहुजन समाजाला राजकारणात मानाचे पान दिले. त्यामुळे 60 ते 70 वर्षांत पवारांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवले अशी वाचाळकी करणे हे मूर्खाचे लक्षण तर आहेच, पण मनाला कोरोना झाल्याचीही लक्षणे आहेत. त्यामुळे गोपीचंद यांची मानसिक अवस्था समजून घेतली पाहिजे. गोपीचंद पडळकर यांच्या विधानाशी भाजपाचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपाने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्‍यांपासून मात्र स्वतःला झटकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 8:29 am

Web Title: shiv sena saamna editorial critcize bjp leaders and gopichand padalkar ncp sharad pawar corona comment jud 87
Next Stories
1 वाळू माफियांची दहशत
2 वारी अभावी पंढरपूरचे अर्थकारण बिघडले
3 राष्ट्रीय महामार्ग ६च्या चौपदरीकरणात अडथळ्यांची मालिका
Just Now!
X