महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसनेही ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली असा दावा केला होता. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचं कारण सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्याचं समर्थन करताना ते म्हणाले की, “उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल”.

आणखी वाचा- राज्यपाल विधानपरिषदेची यादी मंजूर करतील का? संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली. परिवहनमंत्री अनिल परब, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख या तीन पक्षांच्या मंत्र्यांनी राजभवनवर जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे १२ नावांची यादी सादर केली. दरम्यान राज्य सरकारसोबत सतत होणारं शाब्दिक युद्ध पाहता राज्यपाल सहजासहजी यादी मंजूर करणार नाहीत असं बोललं जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राज्यपाल हे कोणताही राजकीय बखेडा निर्माण करणार नाहीत. राज्यपाल सुज्ञ आहेत. राज्यपालांवर आमचं प्रेम आहे, राज्यपालांचं आमच्यावरही प्रेम आहेत. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे. या प्रेमातूनच पुढील सगळा कारभार सुरळीत होईल”.

आणखी वाचा- ‘श्रद्धा और सबुरी’, काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

यादीत कोणती नावं आहेत –
भाजपामधून अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर